कोल्हापूर : चैत्रपालवीच्या अंकुराप्रमाणे नवविचारांचा ध्यास... आकाश पेलणार्या पंखांसोबत जबाबदारीच्या जाणिवांचे रुजलेले मूळ... परंपरा आणि आधुनिकता यांची सांगड घालत सक्षमीकरणाला आत्मविश्वास, आत्मनिर्भर आणि आत्मसन्मानाची जोड देत रविवारी (दि. 15) दैनिक ‘पुढारी’ व कस्तुरी क्लब आयोजित महिलांच्या भव्य बाईक रॅलीत नारी एकजुटीचे दिमाखदार दर्शन घडले. मराठी नववर्षारंभ अर्थात गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या महिला बाईक रॅली मार्गावर ‘ती’च्या स्वावलंबनाची अनोखी सफर कोल्हापूरकरांनी अनुभवली.
दसरा चौक मैदानावर रविवारी सकाळी साडेआठ वाजता मान्यवर व प्रायोजकांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झाल्यानंतर रॅलीला झेंडा दाखवण्यात येताच महिलांनी बाईक स्टार्ट केली. ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा नारा देत सुरू झालेली रॅली व्हिनस कॉर्नर, स्टेशन रोड, दाभोळकर कॉर्नर, ताराराणी पुतळा येथे येताच ‘जय ताराराणी’च्या नामघोषाने परिसर दणाणून गेला. रॅली मार्गावर नारी शक्तीच्या घोषणा देत खासबाग मैदान, मिरजकर तिकटी, अंबाबाई मंदिर परिसरातील महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौकमार्गे रॅली दसरा चौकात येताच रॅलीपूर्ततेच्या आनंदाला बहर आला. रॅलीची सांगता होण्यापूर्वी डीजेच्या तालावर महिलांनी मनसोक्त नृत्य करत जल्लोष साजरा केला.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छांचा वर्षाव
‘पुढारी’ व कस्तुरी क्लबतर्फे दरवर्षी गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर बाईक रॅलीचे आयोजन केले जाते. सण-उत्सवातून परंपरांची जपणूक करताना सक्षमीकरणाची कास धरणार्या महिलांना व्यासपीठ देणारी ही रॅली उत्साहाला नवा रंग देते. यंदाही रविवारी या रॅलीच्या निमित्ताने महिलांनी एकमेकींच्या छंदांचे, कौशल्याचे कौतुक करत गुढीपाडव्याच्या शुभेच्छांचा वर्षाव केला. नव्या मैत्रीणी जोडल्या. जुन्या मैत्रीची वीण घट्ट केली.
अस्सल मराठमोळा पेहराव अन् परंपरेची सांगड
कुणी पांढर्या रंगाचा कुर्ता, रंगीबेरंगी ओढण्या परिधान केल्या होत्या, तर कुणी भरजरी नऊवारी, सहावारी साड्या आणि पारंपरिक दागिन्यांचा शृंगार केला होता. मराठमोळा पेहराव आणि ओसंडून वाहणारा उत्साह अशा वातावरणात दसरा चौक मैदानाचा कानाकोपरा प्रफुल्लित झाला होता. ढोल-ताशाच्या ठेक्याने रॅलीत सहभागी होण्याचा उत्साह अधिकच उंचावला होता. सावित्रीबाई फुले, छत्रपती ताराराणी यांच्या वेशभूषेत आलेल्या महिलांनी रणरागिणींच्या परंपरेला अधोरेखित केले. कोल्हापुरी फेटा बांधून महिला रुबाबदार झाल्या. नऊवारी साडी, नथ अशा अस्सल मराठमोळ्या वेशभूषेतून महिलांनी संस्कृतीचेही दर्शन घडवले.