

कोल्हापूर : कोल्हापूर पुन्हा एकदा तिरुपतीशी हवाई मार्गे थेट जोडले जाणार आहे. येत्या मार्च अखेरपासून या मार्गावर दैनंदिन सेवा सुरू होणार आहे. याबरोबर कोल्हापूर-हैदराबाद या मार्गावर आणखी एक सेवा सुरू होणार आहे. यामुळे कोल्हापूर ते हैदराबाद या मार्गावर रविवार, सोमवार आणि बुधवार या दिवशी दिवसभरात तीन फ्लाईट, तर उर्वरित चार दिवस दिवसभरात दोन फ्लाईट उपलब्ध होणार आहेत.
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई आणि तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढत आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी परिसरातून तिरुपतीला जाणार्या भाविकांची संख्या अधिक आहे. तिरुपतीमधून चेन्नईला अवघ्या तीन ते साडेतीन तासात रस्ते मार्गे पोहोचता येत असल्याने व्यवसाय, व्यापार आदींसह अन्य कारणांनी चेन्नईला जाणार्या प्रवाशांचीही संख्या अधिक असते. यामुळे 12 मे 2019 पासून कोल्हापूर-तिरुपती मार्गावर ‘इंडिगो’ची दैनंदिन विमानसेवा सुरू झाली होती. मात्र, कोरोनानंतर 15 डिसेंबर 2023 पासून ती बंद झाली. यानंतर स्टार एअरने 31 मार्च 2024 पासून आठवड्यातून तीन दिवस या मार्गावर सेवा सुरू केली होती. ती सेवाही बंद झाली आहे. या मार्गावर फ्लाय 91 या कंपनीने विमान सेवेचा प्रस्ताव दिला आहे. हैदराबाद-कोल्हापूर, कोल्हापूर-तिरुपती, तिरुपती-कोल्हापूर आणि कोल्हापूर- हैदराबाद असा हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. कंपनीने मार्च अखेरपासून ही सेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे.
कोल्हापूर-बंगळूर मार्गावर स्टार एअर एक फेब्रुवारीपासून विमानसेवा सुरू करत आहे. मात्र, ही आठवड्यातून दर गुरुवार आणि रविवार अशी दोन दिवस ही सेवा असेल. यामुळे आठवड्यातून दोन दिवस बंगळूरसाठी आणि बंगळूरहून कोल्हापूरला येण्यासाठी पुन्हा दिवसभरात दोन फ्लाईट उपलब्ध होणार आहेत.
कोल्हापूर- हैदराबाद/ आठवड्यातून तीन दिवस दररोज तीन
कोल्हापूर- हैदराबाद/आठवड्यातून चार दिवस दररोज दोन
कोल्हापूर-तिरुपती/ दररोज एक
कोल्हापूर-बंगळूर/ आठवड्यातून दोन दिवस दररोज दोन
कोल्हापूर-बंगळूर/ आठवड्यातून पाच दिवस दररोज एक
कोल्हापूर-मुंबई/ दररोज एक
कोल्हापूर-अहमदाबाद/आठवड्यातून तीन दिवस दररोज एक
यापूर्वी कंपनी गोवा-कोल्हापूर, कोल्हापूर-हैदराबाद, हैदराबाद-कोल्हापूर आणि कोल्हापूर-गोवा या मार्गासाठी इच्छुक होती. मात्र, कंपनीचा कोल्हापूर-तिरुपती आणि कोल्हापूर-हैदराबाद मार्गासाठी प्रस्ताव सादर झाला आहे. यामुळे कोल्हापूर-गोवा विमानसेवा लांबणीवर पडणार आहे.