

कोल्हापूर : कोल्हापूरच्या आल्हाददायक वातावरणाला हवामान बदल आणि प्रदूषणाचा राक्षस गिळंकृत करत चालला आहे. यामुळे दुष्काळ, महापूर आणि चक्रीवादळांसारख्या प्रलयकारी घटनांमध्ये वाढ होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, समुद्रांमध्ये तयार होणारी विनाशकारी चक्रीवादळे कोल्हापूरच्या हवामानावर घाला घालत असल्याचे संशोधानातून समोर आले आहे. 2019 मध्ये अरबी समुद्रात तयार झालेल्या वायू चक्रीवादळामुळे कोल्हापूरच्या वातावरणात मोठ्या गुरुत्वीय लहरी तयार झाल्या होत्या. या लहरींमुळे कोल्हापुरातील पावसाच्या पॅटर्नमध्ये, तापमानात बदल झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
जेव्हा एखादे मोठे चक्रीवादळ तयार होते, तेव्हा गुरुत्वीय लहरी निर्माण होतात. या लहरींमुळे वातावरणातील संवेग (मोमेंटम) वरच्या थरांमध्ये पोहोचतो आणि वादळाची ताकद वाढते. या लहरींमुळे आजूबाजूच्या प्रदेशांतील वातावरणावर घातक परिणाम होतो. गुरुत्वीय लहरींमुळे पावसाचे प्रमाण अचानक वाढू शकते आणि मोठे पूर येऊ शकतात. वायू चक्रीवादळामुळे तयार झालेल्या गुरुत्वीय लहरींमुळे कोल्हापुरात 2019 साली पावसाचे प्रमाण वाढल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. या संशोधनातुन समुद्रांत तयार होणार्या चक्रीवादळांच्या कोल्हापूरच्या वातावरणावर देखील परिणाम होत असल्याचे सिद्ध झाले आहे.
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या मिडियम फ्रिक्वेन्सी रडार व नासाच्या अॅटमॉसफिअरिक इन्फ्रारेड साऊंडर (एआयआरएस) उपग्रहाच्या मदतीने या लहरींची तीव्रता मोजण्यात आली होती. गुरुत्वीय लहरींची दिशा उत्तर-दक्षिण दिशेत असल्याचे ‘पर्टर्बेशन एलिप्स’ तंत्रामुळे समजले होते.
चक्रीवादळामुळे 13 जून 2019 रोजी जवळपास 40 केल्विन तीव्रता असलेली ‘मेसोस्फिअरिक इन्व्हर्शन लेयर’ तयार झाली होती. ही एक वातावरणीय घटना आहे. यामध्ये पृथ्वीच्या वातावरणातील एक स्तरातील तापमान 10 ते 50 केल्विनने वाढते. ही वाढ सुमारे 10 किलोमीटर उंचीवर दिसून येते आणि काही काळ टिकते. हजारो किलोमीटरपर्यंत याचा परिणाम दिसू शकतो. यामुळे वार्यांची दिशा आणि वेग बदलू शकतो, ज्यामुळे हवामान अनियमित होऊ शकते. उच्च वातावरणातील वार्यांची ताकद वाढू शकते, अचानक हवामानात बदल घडू शकतो.
वायू चक्रीवादळामुळे 30 ते 60 मिनिटांच्या गुरुत्वीय लहरी तयार झाल्या होत्या. अशा ग्रॅव्हिटी वेव्हज्चा हवामानावर गंभीर परिणाम होतो. यामुळे हवामानाच्या पॅटर्नमध्ये बदल होतो. परिणामी पावसाचे प्रमाण अचानक वाढते, तापमानात बदल होतात.
-डॉ. रुपेश घोडपागे, मिडियम फ्रिक्वेन्सी रडार, शिवाजी विद्यापीठ