कोल्हापूर : वाहतूक नियोजन, त्याकरिता आवश्यक उपाय योजनांचा अभाव, भरधाव वेग आणि नियमांचे न केले जाणारे पालन यामुळे विद्यार्थ्यांची सर्वाधिक गर्दी असणारा सायबर चौक दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. सलग दोन वर्षांत दोन भीषण अपघात झाल्याने त्याची तीव्रता अधिक स्पष्ट झाली आहे. यामुळे या ठिकाणी वाहतूक नियोजनाच्या उपाययोजना तातडीने राबवण्याची गरज आहे.
शिवाजी विद्यापीठ, राजाराम महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, सायबर अशा चार मोठ्या शैक्षणिक संस्थांचा मध्यबिंदू, पुणे-बंगळूर महामार्गावरून शहरात प्रवेश करणारा प्रमुख मार्ग आणि शहराच्या प्रमुख उपनगरांना जोडणारा मध्यवर्ती परिसर म्हणजे सायबर चौक. दिवसेंदिवस सायबर चौकातील वाहनांची वर्दळ वाढत आहे. वाहन संख्येबरोबर विद्यार्थी आणि पादचार्यांचीही संख्या वाढतच आहे. यामुळे सर्वाधिक व्यस्त चौकांपैकी एक म्हणून सायबर चौक ओळखला जात आहे.
सायबर चौकातील भौगोलिक परिस्थिती, वाहतूक नियोजनाचा अभाव यामुळे हा चौक दिवसेंदिवस धोकादायक बनत आहे. त्याची प्रचिती दि. 3 जून 2024 आणि दि. 9 डिसेंबर 2025 मध्ये या चौकात झालेल्या अपघाताने आली आहे.
नेमके होतेय काय?
राजाराम महाविद्यालयाकडून चौकात येताना तीव्र उतार आहे. यावेळी वाहनांचा वेगही अधिक असतो. त्यात सिग्नलजवळ रस्त्याची रुंदी कमी होते. सिग्नलसाठी वाहनांची रांग अनेकदा 50 मीटरच्याही पुढे येते. त्याच ठिकाणी डाव्या बाजूला वळण घेणार्या वाहनचालकांचे वाहनांवर नियंत्रण सुटण्याची भीती असते. डाव्या बाजूला वळण घेताच समोर पार्किंग केलेली वाहने, पादचारी, विद्यार्थ्यांची गर्दी असते. या मार्गावरून भटक्या आणि पाळीव जनावारांचीही ये-जा होत असल्यामुळे वाहतूक विस्कळीत होते. यामुळे वाहन नियंत्रित करताना अपघात होण्याची शक्यता असते. असे अनेकदा लहान-मोठे अपघात झाले आहेत.
अवजड वाहतुकीसाठी प्रमुख मार्ग
शहरात येऊन, शहाराबाहेर जाणार्या अवजड वाहतुकीसाठी हा प्रमुख मार्ग आहे. महामार्गावरून सायबर चौक- हॉकी स्टेडियम- कळंबामार्गे पुढे गारगोटीकडे जाणारी, रिंगरोडवरून पुढे राधानगरी आणि त्यापुढे गगनबावडाकडेही जाणारी अवजड वाहतूक या मार्गावरून सुरू असते. ही अवजड वाहने अनेकदा गर्दीच्यावेळीही असतात. त्यामुळेही अपघाताला निमंत्रण मिळू शकते.
अनेकांकडून नियमांचे पालन होत नाही
या चौकात बहुतांश वेळेला वाहतूक पोलिस नसतात. असतील तर ते सायबर महाविद्यालया समोरील बाजूस कारवाई करण्यासाठी थांबलेले असतात. यामुळे या चौकात सर्वसामान्य वाहनचालकांकडून नियमांची अनेकदा पायमल्लीच होत असते. अनेकजण सिग्नल तोडून जातात. अनेक वाहनधारक झेब—ा क्रॉसिंगपुढे जाऊन थांबले असतात. राजारामपुरीकडून आलेली वाहनांनी रस्त्यावरील निम्म्याहून अधिक जागा व्यापलेली असते. यामुळे राजारामपुरीकडे जाणार्या वाहनांना अडचण होत असते.
सायबर चौकातच का होताहेत अपघात?
राजाराम महाविद्यालयाकडून सायबर चौकाकडे येताना तीव्र उतार
या उतारावर वेगावर नियंत्रण ठेवताना वाहनधारकांची दमछाक
सिग्नलजवळ रस्त्याची रुंदी कमी; वाहनांची संख्या अधिक
डाव्या बाजूला तीव्र वळण, त्यावरही वेग नियंत्रण करताना दमछाक
पादचार्यांची, रस्ता पार करणार्यांची संख्या तुलनेने अधिक