Bitcoin price : जगभरातील क्रिप्टो करन्सींना अखेर घरघर!

बिटकॉईनसह सर्वच आभासी चलनांच्या किमतीत घसरण सुरू; गुंतवणूकदार हवालदिल
Bitcoin price
जगभरातील क्रिप्टो करन्सींना अखेर घरघर!
Published on
Updated on

सुनील कदम

कोल्हापूर : जगभरातील क्रिप्टो करन्सींना (आभासी/डिजिटल चलन) अखेर घरघर लागलेली दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सर्वच आभासी चलनांच्या किमती झपाट्याने खाली येताना दिसत आहेत.

आभासी चलनांचा उदय!

जपानमधील सातोशी नाकामोटो या संगणकतज्ज्ञाने सर्वप्रथम सन 2009 मध्ये ‘बिटकॉईन’ हे आभासी चलन जागतिक बाजारपेठेत आणले. इंटरनेटच्या माध्यमातून चालणार्‍या जगभरातील सर्व प्रकारच्या डिजिटल आणि ऑनलाईन आर्थिक व्यवहारांसाठी एकच समान चलन असावे, या हेतूने त्याने हे आभासी चलन बाजारात आणले होते. मात्र, बिटकॉईन या चलनाला त्यावेळी जगातील कोणत्याही देशाची मान्यता नव्हती. तरीदेखील जगभरात गेल्या दहा-पंधरा वर्षांत बिटकॉईनने चांगलीच उभारी घेतली. परिणामी, आज जगाच्या पाठीवर शंभरहून अधिक आभासी चलने अस्तित्वात आली आहेत.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून जगभरातीलच गुंतवणूकदारांचा आभासी चलनांवरील विश्वास हळूहळू कमी होऊ लागला आहे. त्याचा परिणाम म्हणून गेल्या काही दिवसांत बिटकॉईनची किंमत जवळपास 2.5 टक्क्यांनी घसरली आहे. असे असले तरी आजही जागतिक बाजारपेठेत बिटकॉईनचे स्थान मजबूत आहे. भारतीय चलनानुसार, आज एका बिटकॉईनची किंमत 99.44 लाख रुपये आहे. मात्र, किंमत घसरणही सुरू आहे. गेल्या आठवड्यात इथेरियम या आभासी चलनाच्या किमतीमध्ये 6 टक्के, रिपल चलनामध्ये 5 टक्के, सोलानामध्ये 7 टक्के, डॉजकॉईनमध्ये 10 टक्के आणि पाई नेटवर्कच्या किमतीत 17 टक्के घट झालेली दिसत आहे. जगभरातीलच बहुतेक सगळ्या आभासी चलनांच्या किमती अशाच पद्धतीने कोसळताना दिसत आहेत. जगभरातील गुंतवणूकदारांना या पडझडीमुळे हजारो कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

किंमत घसरण्याची कारणे!

आभासी चलनांच्या किमती घसरण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी प्रमुख कारण म्हणजे, या आभासी चलनांचे अनिश्चित भवितव्य आता हळूहळू गुंतवणूकदारांच्या लक्षात येऊ लागले आहे. दुसरीकडे, जगभरातील अनेक बड्या कंपन्यांनी आभासी चलनातील आपली गुंतवणूक कमी करायला किंवा काढून घ्यायला सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे जगभरात आता मजबूत आर्थिक आणि द़ृश्य आधार असलेल्या काही नवीन आभासी चलनांचा उदय होऊ लागला आहे. त्यामुळे जुन्या आभासी चलनांमधील गुंतवणूक आणि किंमतही घटताना दिसून येत आहे.

देशातून मोठी गुंतवणूक!

आभासी चलनांच्या व्यवहारांना भारतात मान्यता नसली, तरी दिल्ली, मुंबई, बंगळूर, कोलकाता, जयपूर, कोल्हापूर, पाटणा, लखनौ आदी शहरांमधून आभासी चलनांमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. मात्र, आता किमती घसरल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.

दै. ‘पुढारी’ने पूर्वीच दिला होता इशारा...

आभासी चलनांच्या अनिश्चित भवितव्याबाबत आणि त्याच्या गुंतवणुकीतील धोक्याबाबत दै. ‘पुढारी’ने नोव्हेंबर 2017 मध्ये ‘आभासी चलनांचे मायाजाल’ ही मालिका लिहून गुंतवणूकदारांना इशारा दिला होता. आभासी चलन कसे बेभरवशाचे आहे, त्यातील गुंतवणूक देशाच्या द़ृष्टीने कशी धोकादायक आहे, आभासी चलनांमुळे भ्रष्टाचाराला आणि दहशतवादाला कशी चालना मिळेल आदी बाबींचा या मालिकेत ऊहापोह करण्यात आला होता. आभासी चलनांची आता सुरू झालेली पडझड पाहता दै. ‘पुढारी’ने दिलेला इशारा किती रास्त होता, त्याचा प्रत्यय आता येतो आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news