Khidrapur Kopeshwar Temple | खिद्रापूर कोपेश्वर मंदिरात अलोट गर्दी

(छाया : दर्शन वडेर, नृसिंहवाडी)
खिद्रापूर : येथील ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरात श्रावण सोमवारी विशेष पूजा झाली.
Published on
Updated on

नृसिंहवाडी : श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी खिद्रापूर येथील जगप्रसिद्ध शिल्पकलेचा अद्‌भुत नमुना असलेल्या प्राचीन कोपेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. पहाटेपासूनच ‘हर हर महादेव’च्या अखंड जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.

विलोभनीय स्वर्गमंडप, अद्वितीय दगडी कोरीव काम व नक्षीदार गजस्तंभांनी सजलेल्या या ऐतिहासिक मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बेलपत्र, फुले व जलाभिषेक अर्पण करून शिवभक्तांनी दर्शन घेतले. परंपरेनुसार पहाटे वेदमूर्ती गजानन जोशी, रमेश जोशी व गणेश जोशी या पुजाऱ्यांच्या हस्ते मंगलमय वातावरणात काकड आरती संपन्‍न झाली. त्यानंतर विधिवत रुद्राभिषेक, लघुरुद्र सेवा, धूप-दीप व पुष्पवृष्टीसह महापूजा पार पडली.

पहिल्या श्रावण सोमवारचे औचित्य साधून भाविकांनी कोपेश्वर व धोपेश्वर या दोन्ही पिंडींवर अत्यंत श्रद्धेने तांदळाची शिवामूठ अर्पण केली. रविवारी मध्यरात्रीपासूनच महाराष्ट्र व शेजारील कर्नाटकातून हजारो भाविक खिद्रापूरमध्ये येत होते. कृष्णा नदीच्या विलोभनीय तीरावर वसलेल्या या मंदिराच्या परिसरात जणू यात्रेचेच स्वरूप आले होते. मंदिराबाहेर बेल-फुले, पूजा साहित्य व प्रसादाची दुकाने सजली होती. स्थानिक अर्थकारणालाही मोठी चालना मिळाली.

अनेक भाविकांनी मंदिराच्या स्वर्गमंडपात आणि विशाल प्रांगणात बसून काही काळ ध्यानसाधना केली, मंदिराच्या भिंतींवर कोरलेल्या अप्रतिम शिल्पकलेचा मनसोक्त आनंदही लुटला. अलौकिक शिल्पसौंदर्य आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम असणाऱ्या या मंदिरात दिवसभर सुरू राहिलेल्या भक्तिमय सोहळ्यामुळे खिद्रापूरनगरीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. केवळ कोपेश्वरच नव्हे, तर कुरुंदवाड परिसरातील कल्लेश्वर महादेव व कृष्णा घाटावरील सुब्रह्मण्येश्वर मंदिरातही दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news