

शहनवाज अपराध
दत्तवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील दूधगंगा नदीचा काठ मगरींच्या दहशतीमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या दोन वर्षांत या मगरींनी सहा ते सात वेळा माणूस व जनावरांवर हल्ले केले आहेत. यामुळे दोन निष्पाप माणसांना, तर चार जनावरांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सध्या दत्तवाड येथील दूधगंगा नदी काठ भीतीच्या छायेखाली वावरत आहे.
चार दिवसांपूर्वी दूधगंगा नदीतील एका पूर्ण वाढ झालेल्या मगरीने आंघोळीसाठी गेलेल्या एका व्यक्तीवर हल्ला करून ठार केले. गेल्यावर्षी देखील कर्नाटकातील सदलगा येथील एक वृद्ध कुरणातील गवत कापून आंघोळीसाठी नदीपत्रात उतरले असता, त्याच्यावरही मगरीने हल्ला करून ठार केले होते. त्यामुळे दोन वर्षांत दोन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. तसेच गेल्यावर्षी आंघोळीसाठी गेलेल्या एका व्यक्तीवर मगरीने हल्ला केला होता. सुदैवाने मगरीच्या जबड्यातून सदर व्यक्ती निसटला; मात्र त्याच्या पायावर खोलवर जखमा झाल्या होत्या.
याशिवाय मागील एक-दोन वर्षांत एक शेतकरी आपल्या घोड्याला धुण्यासाठी नदीपात्रात उतरले असता, या घोड्यावर मगरीने हल्ला करून त्याला ओढून नेले. मगरीने घोड्याला नदीच्या मधोमध घेऊन जात असताना नदीच्या दोन्ही बाजूने आरडाओरडा केले तरी त्याला सोडले नाही. अखेर तिसर्या दिवशी धरलेल्या ठिकाणाहून एक ते दीड किलोमीटर अंतरावर त्या घोड्याचे शीर तेवढे शिल्लक राहिले होते. तसेच गवताच्या कुरणात चरणार्या एका रेडकू तसेच पाड्यावर मगरीने हल्ला करून त्यांना पाण्यात ओढून नेले. तसेच अधूनमधून पाणी पिण्यासाठी पात्रजवळ गेलेल्या दोन मेंढ्या, शेळ्या तसेच कुत्र्यावरही या मगरीने हल्ला करून त्यांना ओढून नेले आहे. वारंवार मगरींचे हल्ले मानवांवर व जनावरांवर होऊनही प्रशासनाकडून व वन विभागाकडून कोणतीही दखल या मगरींचा बंदोबस्त करण्यासाठी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमधून तीव— नाराजी व्यक्त होत आहे.
दत्तवाड येथील कोटलिंग भाग ते घोसरवाड या एक ते दीड किलोमीटर अंतरातील दूधगंगा नदी पात्रात या मगरींचा विशेषत: वावर आहे. वारंवार शेतकर्यांनाही आपल्या पाण्याच्या मोटरी चालू करण्यासाठी गेले असता या मगरी निदर्शनास येतात. त्यामुळे दूधगंगा नदीत किमान पाच ते सात पूर्ण वाढ झालेल्या मगरी असाव्यात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या मगरींच्या दहशतीमुळे आंघोळीसाठी नदीला जाणार्यांची संख्या पूर्णपणे थंडावली आहे. याशिवाय धुणे धुण्यासाठी घाटावर जाणार्या महिलाही भीतीमुळे नदीला जाण्यासाठी दचकत आहेत.
वन विभागाबाबत तीव्र नाराजी
मगरीच्या हल्ल्यामुळे एका निष्पाप व्यक्तीचा जीव जाऊन चार दिवस उलटले, तरी प्रशासन व वन विभागाकडून या मगरींचा बंदोबस्त करण्यासाठी अद्याप कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. त्यामुळे दत्तवाडमधील ग्रामस्थांकडून प्रशासन व वन विभागाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आणखी किती जीवांना आपला जीव गमवावा लागणार, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.