कोल्हापूर : ज्यांनी मतदान केले, ती जनता महारापुराच्या खाईत लोटली, तर त्याला जबाबदार कोण? शक्तिपीठ महामार्गाचे समर्थन करणार्यांनी हे लक्षात ठेवावे, असे सांगत गरज नसताना सर्वच बारा जिल्ह्यांतून तीव्र विरोध असतानाही शक्तिपीठ महामार्ग रेटण्याचा प्रयत्न सुरू आहे. केवळ त्यातून 50 हजार कोटी मिळणार आहेत म्हणून काही जण त्याचे समर्थन करत आहेत, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीने करवीर निवासिनी अंबाबाई चरणी शुक्रवारी दुपारी ‘सरकारला सुबुद्धी दे’ असे साकडे घातले.
आमचा विकासाला विरोध नाही; मात्र आमची थडगी बांधून विकासाचे मनोरे उभारू नका, असा इशारा देत शेट्टी म्हणाले, शक्तिपीठ महामार्गावर पट्टणकोडोली ते माणगावदरम्यान पंचगंगा नदीवर होणारा पूल महापुराला कारणीभूत ठरणार आहे. महापुराच्या काळात निम्मे कोल्हापूर शहर पाण्याखाली जाते. हा महामार्ग झाला, तर पूराचे पाणी बिंदू चौकापर्यंत येईल. याच महामार्गाअंतर्गत कणेरीपासून जोतिबाला जोडणारा रस्ताही पुराच्या खाईत लोटणारा आहे. भोगावती व कासारी नदी परिसरातील भरावामुळे कोल्हापूरच्या पश्चिमेकडील खेड्यांचे नुकसान होईल. त्याचा ऊस उत्पादनाला फटका बसणार आहे.
या महामार्गाला कोल्हापुरातून विरोध नाही, असे भासवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे, असे सांगत शेट्टी म्हणाले, समांतर रस्ता असताना शक्तिपीठ महामार्गाची गरज नाही असे सांगूनही सरकारकडून हा महामार्ग रेटण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. सरकारला शक्तिपीठ महामार्ग पाहिजे असेल, तर त्यांनी नागपूर ते रत्नागिरी हा महामार्ग आठ पदरी करावा. त्याला आमची हरकत नाही, असेही शेट्टी यांनी सांगितले.
ऐतिहासिक भवानी मंडप येथे समितीचे पदाधिकारी, शेतकरी, कार्यकर्ते सकाळी एकत्र जमले. तेथून ‘शक्तिपीठ हटाओ, कोल्हापूर बचाओ’ अशा घोषणा देत ते अंबाबाई मंदिरात गेले. अंबाबाईचरणी ‘आई अंबाबाई, सरकारला सुबुद्धी दे’ असे साकडे घातले. यानंतर गणरायाची आरती झाली.
यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेना जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले, राजू लाटकर, विनायक फाळके, विनायक घोरपडे, गोकुळचे संचालक बाबासाहेब पाटील, शशिकांत पाटील, प्रवीण पाटील, तौफिक मुल्लानी, संजय पोवार- वाईकर आदींसह इंडिया आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोल्हासुर राक्षसाच्या तावडीतून अंबाबाईने कोल्हापूरचे रक्षण केले होते. आता शक्तिपीठ महामार्गरूपी राक्षस आमच्यावर चालून येत आहे. त्याच्या तावडीतून वाचवण्यासाठी अंबाबाई कोल्हापूरच्या मदतीला धावून येईल आणि शक्तिपीठातून आमचे कोल्हापूर पुन्हा वाचेल म्हणून आम्ही साकडे घालण्यासाठी आल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय पवार शक्तिपीठ महामार्ग विरोधी आंदोलनात सक्रिय आहेत; मात्र शुक्रवारी झालेल्या आंदोलनात ते अनुपस्थित होते, याची चर्चा सुरू होती.