

शिरोली एमआयडीसी : ऐन दिवाळी सणाच्या काळात महामार्गावर शिरोली एमआयडीसी परिसरात दुचाकी वरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील धूम स्टाईलने सोनसाखळी खेचून नेणाऱ्या चोरट्याच्या शोधासाठी दोन पथके कार्यरत आहेत.
या चेन स्नॅचिंगसाठी वापरलेल्या दुचाकी गाडीचा नंबर शोधला असता तो बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. ती गाडीही चोरीची असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून आज परिसरातील अनेक जणांनी भाऊबीज असतानाही दुचाकी वरून घरातील महिलांना घेऊन जाणे टाळले. कारण जिल्हा पोलीस प्रमुखांनी जनतेला केलेल्या आवाहनास चोरट्यांनी भर दिवसा दोन चेन स्नॅचिंग करून जणू पोलिसांसमोर आव्हानच दिले आहे.
या दोन्ही घटना महामार्गांवर मनुग्राफ व एस जे आयर्न या कंपनी दरम्यान घडल्या होत्या. यामध्ये सोन्याचे गंठण व लक्ष्मी हार असा सुमारे पाच लाख रुपयांचा माल लंपास केला होता .या दोन्ही घटनेची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे. या चोरीच्या तपासासाठी गुन्हा अन्वेषन व शिरोली एमआयडीसी ची दोन पथके कार्यरत आहेत, अशी माहिती सपोनी सुनील गायकवाड यांनी दिली आहे.