Acharya Vidyasagar Maharaj : आचार्य श्री विद्यासागर महाराजांच्या पार्थिवावर मंत्रोच्चाराच्या घोषात अग्निसंस्कार

Acharya Vidyasagar Maharaj : आचार्य श्री विद्यासागर महाराजांच्या पार्थिवावर मंत्रोच्चाराच्या घोषात अग्निसंस्कार
Published on
Updated on


किणी :  दिगंबर जैन मुनी परंपरेचे राष्ट्रसंत, साहित्यिक मुकमाटी रचेता आचार्य श्री विद्यासागर महाराज यांचे रात्री २ वाजून ३८ मिनिटांनी डोंगरगढ चंद्रगिरी (छत्तीसगड) येथे समधीपूर्वक निर्वाण झाले. त्यांच्या समाधीमरणाने संपूर्ण जैन समाजसह त्यांचा भक्तगण शोकसागरात बुडाला. आज (दि.१८) दुपारी हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत डोंगरगढ येथे त्यांच्या पार्थिवावर संपूर्ण मंत्रोच्चाराच्या घोषात अग्निसंस्कार करण्यात आले. मध्य प्रदेश व छत्तीसगड सरकारने आज अर्धा दिवस राजकीय शोक पाळत सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करून महाराजांना विनयांजली वाहिली.  Acharya Vidyasagar Maharaj

कर्नाटकमधील सदलगा (ता. चिकोडी, जि. बेळगाव) येथे १० ऑक्टोबर १९४६ रोजी  शरद पौर्णिमेला जन्मलेल्या विद्यासागर यांनी ९ वी पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी १९६६ मध्ये आचार्य देशभूषण महाराज यांच्याकडून ब्रह्मचर्य व्रत स्वीकारले होते. ३० जून १९६८ रोजी कठोर तपश्चर्या पाहून त्यांना आचार्य ज्ञानसागर महाराज यांनी मुनींदिक्षा दिली. ते २४ वर्षांचे असताना त्यांच्या गुरूंनी त्यांच्याकडे आचार्यपद सोपवले. संपूर्ण जगातील जैन व जैनेत्तर धर्मातील करोडो लोकांचे आस्थास्थान असणाऱ्या आचार्य विद्यासागर यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण करत सत्य अहिंसा आणि शिक्षणाचा प्रसार केला. दयोदय सारखी मोठमोठी रुग्णालये त्यांच्याच प्रेरणेने उभारण्यात आली. विविध ठिकाणी भव्य दिव्य जैन तीर्थक्षेत्र उभारण्याबरोबरच गोशाळा, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, अनाथाश्रम, हातकरघा (हातमाग) केंद्रे निर्माण केली. Acharya Vidyasagar Maharaj

अनेक धार्मिक व आध्यात्मिक पुस्तकांच्या लेखनाबरोबरच 'मुकमाटी' या त्यांनी लिहिलेल्या महाकाव्यास अनेक राष्ट्रीय व जागतिक पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले. त्यांची विविध पुस्तके आज विविध विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहेत. आयुष्यभर त्यांनी गोड पदार्थ, तेल, पालेभाज्या, दूध दही, भाज्या, फळे तसेच मीठ या पदार्थाचा त्याग केला होता. झोपण्यासाठी चटई सुध्दा वापरत नव्हते. अंगाच्या एकाच बाजूने झोपणे, आयुष्यभर न थुंकण्याचे त्यांचा‌ नियम होता. अतिशय आयएएस, आयपीएस, पी. एचडीधारक, डॉक्टर्स अशा उच्चशिक्षित ३५० श्रावक श्रविकांना त्यांनी दिक्षा देऊन श्रमण संस्कृती मार्गात आणून सोडले.

विशेष म्हणजे  आचार्यश्री यांच्याकडून  त्यांचे तीन बंधू, आई, वडील,दोन बहिणींनी दिक्षा घेऊन मुनिमार्ग स्वीकारला आहे. मराठी, कन्नड, हिंदी, संस्कृत भाषेसह आठ भाषा त्यांना अवगत होत्या. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे डोंगरगढ येथे दर्शन घेऊन विविध विषयांवर मार्गदर्शन घेतले होते. गृहमंत्री अमित शहा, शिवराज सिंग चौहान, जे.पी. नड्डा, दिग्विजय सिंग यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील दिगग्ज महाराजांचे भक्त आहेत. विविध राज्यांनी त्यांना विशेष अतिथीचा दर्जा दिला होता.

मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. ६ फेब्रुवारीरोजी त्यांनी निर्यापक श्रमण योगसागर महाराज यांच्याशी चर्चा करून मुनिसंघ कार्यातून निवृत्ती घेत आचार्यपदाचा त्याग केला होता. गेली तीन दिवस अखंड मौन धारण करत त्यांनी आहार आणि संघाचा त्याग करत यम सल्लेखना धारण केली. आज रात्री २ वाजून ३८ मिनिटांनी त्यांना समाधीमरण प्राप्त झाले.

'इंडिया नही,,, भारत बोलो'

संपूर्ण आयुष्यभर आचार्य विद्यासागर महाराज यांनी प्रत्येक प्रवचनातून त्यांनी जनतेला धर्मभक्तीबरोबरच देशभक्तीविषयी जागृत राहण्याचे आवाहन केले. प्रत्येक प्रवचनात त्यांनी 'इंडिया नही भारत बोलो' चा नारा दिला. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात ही घोषणा होत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हीच घोषणा केली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news