कोल्हापूर : कोल्हापूरच्या प्रत्येक लढ्यात दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव सतत अग्रभागी राहिले आहेत. टोल घालविण्याबरोबरच कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्याचे संपूर्ण श्रेय दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचेच आहे, अशा शब्दांत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. जाधव यांचे अभिनंदन करताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्याची घोषणा झाल्यानंतर मंत्री पाटील यांनी बुधवारी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी डॉ. जाधव यांचे नातू ऋतुराज पाटील उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले, सर्किट बेंचचे श्रेय अन्य कोणाचे आहे की नाही, मला माहीत नाही. परंतु, डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे संपूर्ण श्रेय आहे. ‘पुढारी’कारांची लेखणी ज्या दिशेने जाते, त्याच दिशेने समाज जातो, हे आपण राजू शेट्टींच्या ऊस आंदोलनापासून पाहत आलो आहे. टोलच्या लढ्यातही ते दिसून आले. कोल्हापुरातील टोलचा लढादेखील आपल्यामुळे यशस्वी झाला आणि आता कोल्हापुरात सर्किट बेंच केवळ आपल्यामुळेच स्थापन होऊ शकले.
कोल्हापूरच्या द़ृष्टीने हा ऐतिहासिक निर्णय आहे. सर्किट बेंच उद्घाटन कार्यक्रमाच्या नियोजनाबाबतही मंत्री पाटील यांनी डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी चर्चा केली. ‘न भूतो, न भविष्यति’ असा हा कार्यक्रम करण्यासाठी आपणही यामध्ये लक्ष घालावे, अशी विनंती मंत्री पाटील यांनी डॉ. प्रतापसिंह जाधव यांना केली.
या भेटीत खंडपीठाच्या लढ्याच्या इतिहासावरही डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी मंत्री पाटील यांच्याशी चर्चा केली. डॉ. जाधव म्हणाले, कोल्हापुरात खंडपीठ व्हावे म्हणून दि. 14 मे 1974 रोजीच्या दैनिक ‘पुढारी’च्या अंकात अग्रलेख लिहिला होता. खंडपीठासाठी अग्रलेख लिहिणारे ‘पुढारी’ हे एकमेव दैनिक होते. त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहूरायांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम 1974 मध्ये कोल्हापुरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांच्यासारखे ज्येष्ठ नेते व्यासपीठावर उपस्थित होते. या जन्मशताब्दी समारंभाच्या भाषणामध्ये खंडपीठाची मी प्रथम जाहीर मागणी केली. त्यावेळी अनेक मोठ्या नेत्यांनी हे कसे शक्य आहे, असे मला सांगितले. परंतु, औरंगाबाद, नागपूरला होऊ शकते, मग कोल्हापुरात का होऊ शकत नाही. आपण प्रयत्न केले पाहिजे, असे मी त्यांना सांगितले. त्यानंतर 1980 मध्ये कराडला वकिलांची परिषद घेतली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. तेव्हा विधी व न्याय खात्याचे मंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर होते. त्यानंतर सांगली, सातारा, कोल्हापूर येथे परिषदा घेण्यात आल्या.
भूषण गवई यांची भारताच्या सरन्यायाधीशपदी निवड झाल्यानंतर आपण त्यांचे फोनवरून अभिनंदन केले. त्यावेळी त्यांना आपण खंडपीठासंदर्भात बोललो होतो. यावर भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनीदेखील अनुकूलता दर्शवत अतिशय सकारात्मक भूमिका घेतली आणि सर्किट बेंचची स्थापना झाली, असेही डॉ. जाधव यांनी सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे उपस्थित होते.