

कोल्हापूर : सीपीआर येथील बालरोगशास्त्र विभागाने जीबीएस आजाराने गंभीर झालेल्या 12 वर्षीय बालकाला जीवदान दिले. सावर्डे (ता. भुदरगड) येथील आर्यन भगवान म्हातुगडे असे रुग्णाचे नाव असून, तब्बल दोन महिने त्याच्यावर उपचार सुरू होते.
आर्यन याला गंभीर अवस्थेत 31 जानेवारी 2026 रोजी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्याने तज्ज्ञ डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याला जीबीएस झाल्याने निष्पन्न झाले. तत्काळ त्याला अतिदक्षता विभागात हलवून इंट्राव्हेनस इम्युनोग्लोब्युलिन उपचार पद्धतीचा वापर करण्यात आला. अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, बालरोग विभागप्रमुख डॉ. संगीता कुंभोजकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात आले. बुधवारी (दि. 8) त्याला डिस्चार्ज करण्यात आले. उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत करण्यात आले.
नातेवाईकांनी वैद्यकीय पथाचे आभार मानले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे, सहयोगी प्राध्यापक डॉ. शिशिर मिरगुंडे, सहायक प्राध्यापक डॉ. महेश्वरी जाधव, मीना डिसुजा, मीना पंडित, समाजसेवा अधीक्षक अजित भास्कर उपस्थित होते.