

कोल्हापूर : राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या अर्थात सीपीआरच्या चतुर्थ श्रेणीच्या (गट ड) पदासाठी अक्षरश: झुंबड उडाली आहे. 96 जागांसाठी सुमारे 18 हजार अर्ज आले आहेत. या उमेदवारांची सोमवारी (दि. 19) राज्यातील विविध केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा होणार आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील गट-ड (वर्ग 4) संवर्गातील विविध पदांकरिता एकाच दिवशी राज्यातील विविध केंद्रांवर दोन सत्रांत परीक्षा होणार आहे. परीक्षा प्रक्रिया आय.बी.पी.एस. कंपनीकडून केली जात आहे. परीक्षेचे प्रवेश पत्र www. rcsmgmc.ac.in व https:/// kolhapur.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. प्रवेशपत्रांवर परीक्षा केंद्र देण्यात आले असून प्रवेशपत्रानुसारच उमेदवाराला प्रवेश दिला जाणार आहे. परीक्षेबाबत सर्व सूचना संस्थेच्या www. rcsmgmc.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात येणार आहेत.
या परीक्षेसंदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणत्याही आमिषास बळी पडू नये तसेच कोणाशीही कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करू नयेत. अधिक माहितीसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या 02312641583 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी केले आहे.