Kolhapur CPR Hospital | सीपीआर हॉस्पिटलचा हृदयरोग विभाग महाराष्ट्रात क्रमांक एक

सर्वाधिक ११ टीएव्हीआय यशस्वी शस्त्रक्रिया : डॉ. भिसे
कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयाच्या हृदयरोग विभागाने ज्येष्ठ गंभीर रुग्णांवर यशस्वी प्रकिया केली.
कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयाच्या हृदयरोग विभागाने ज्येष्ठ गंभीर रुग्णांवर यशस्वी प्रकिया केली.
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) शासकीय रुग्णालयाच्या हृदयरोग विभागाने आज अखेर तब्बल ११ टीएव्हीआय शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केल्या आहेत. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (जीएमसी) ही संख्या सर्वाधिक आहे. या विक्रमामुळे सीपीआरचा हृदयरोग विभाग राज्यात क्रमांक एकचा झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी दिली.

सीपीआरच्या हृदयरोग विभागात दर महिन्याला सुमारे १५० ते २०० उच्च दर्जाच्या प्रक्रिया होतात. गुंतागुंतीच्या अँजिओप्लास्टी, टीएव्हीआय, पेसमेकर, डिव्हाईस क्लोजरपासून ते न्यूरो आणि पेरिफेरल व्हॅस्क्युलर इंटरव्हेंशनपर्यंत सर्वात गंभीर रुग्णांवर जागतिक दर्जाचे उपचार केले जातात. पश्चिम महाराष्ट्रातील डी.एम. कार्डीऑलॉजी या सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमाची ही एकमेव अध्यापन संस्था आहे.

विभागात डॉ. अक्षय बाफना (विभाग प्रमुख, हृदयरोग), डॉ.स्फूर्ती जाधव, डॉ. अजित हांगे, डॉ. आदिब शेख, डॉ. निखिल गदाडे, डॉ. सोमेश चौगुले, डॉ. सम्यक भिवगडे, डॉ. गणेश कामत आणि डॉ. हेमालता देसाई, डॉ. मजीद मुल्ला, डॉ. किशोर देवरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सईदेवी सरदेसाई, डॉ. मनाली माने यांच्यासह टेक्निशियन, नर्सिंग विभाग, प्रशासकिय अधिकारी, टीम रेलिसीस अशी टीम अखंड सक्रिय असून सर्वांना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र मदने, उपअधिक्षक डॉ. गिरीष कांबळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

गंभीर रुग्णांना जीवदान

जयसिंगपूर येथील ८६ वर्षीय पुरुष व कोल्हापूर येथील ७७ वर्षीय महिला रुग्णावर एकाच दिवशी ही यशस्वी प्रक्रिया करण्यात आली. दोघेही गंभीर कॅल्शिफिकेशनने ग्रस्त होते. त्यांना श्वास लागणे, छातीत दुखणे,चक्कर येणे, पायावर सूज येणे, तसेच उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. त्यांचे वय आणि ओपन हार्ट सर्जरीसाठी असलेला उच्च धोका लक्षात घेऊन, हृदयरोग विभागप्रमुख डॉ. अक्षय बाफना यांच्या नेतृत्वाखालील हार्ट टीमने ही प्रक्रिया केली. यामध्ये छाती न उघडता मांडीतील रक्तवाहिनीतून अनुक्रमे २९ मिमी व २६ मीमी नवीन झडप बसवण्यात आली. दोन्ही रुग्ण दुसऱ्या दिवशी चालायला लागले व तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.