Kolhapur | सीपीआरमध्ये एकाच दिवशी तीन रुग्णांवर यशस्वी ‘टावी’ शस्त्रक्रिया

हृदयरोग विभागाची कौतुकास्पद कामगिरी; १६ ते १८ लाखांचे उपचार मोफत
कोल्हापूर : ‘टावी’ शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसोबत मंत्री हसन मुश्रीफ, डाॅ. अक्षय बाफना, डाॅ. गिरीश कांबळे आदी.
कोल्हापूर : ‘टावी’ शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसोबत मंत्री हसन मुश्रीफ, डाॅ. अक्षय बाफना, डाॅ. गिरीश कांबळे आदी.
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयाच्या (सीपीआर) हृदयरोग विभागाने वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. छाती न उघडता हृदयाची झडप बदलण्याच्या अत्याधुनिक ‘टावी’ (TAVI) उपचारपद्धतीचा वापर करून एकाच दिवशी तीन ज्येष्ठ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शासकीय आरोग्यव्यवस्थेतील ही कामगिरी अत्यंत कौतुकास्पद मानली जात आहे.

या वैद्यकीय मोहिमेत ८२ वर्षीय पुरुष आणि ८० वर्षांच्या दोन महिलांचा समावेश होता. हे तिघेही महाधमनी झडप अरुंद व कडक होण्याच्या गंभीर आजाराने ग्रस्त होते. वाढते वय, चालताना लागणारा दम आणि सहव्याधींमुळे पारंपरिक ओपन-हार्ट सर्जरी अत्यंत धोकादायक होती. या पार्श्वभूमीवर हृदयरोग विभागप्रमुख डॉ. अक्षय बाफना व त्यांच्या वैद्यकीय पथकाने ‘टावी’ उपचाराचा मार्ग निवडला. यामध्ये मांडीच्या रक्तवाहिनीतून नळीद्वारे कृत्रिम ‘सेल्फ एक्सपांडेबल’ झडप हृदयापर्यंत नेऊन बसवली जाते. या अत्याधुनिक पद्धतीमुळे तिन्ही रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर दोन रुग्ण अवघ्या दुसऱ्याच दिवशी चालू लागले आणि तिसऱ्या दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, तर एका रुग्णाला सहाव्या दिवशी घरी सोडण्यात आले.

खासगी रुग्णालयांमध्ये या उपचारासाठी प्रतिरुग्ण सुमारे १६ ते १८ लाख रुपये खर्च येतो. मात्र, ‘शास’ कॉर्पस फंडातून मिळालेल्या आर्थिक साहाय्यामुळे सीपीआरमध्ये हा महागडा उपचार तिन्ही गरजूंवर पूर्णपणे मोफत करण्यात आला. या उपचारात डॉ. बाफना यांच्यासह डॉ. पाटील, डॉ. मजित मुल्ला, डॉ. किशोर देवरे, डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. कोळे तसेच डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मदाने यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मंत्री मुश्रीफ यांनी डॉक्टर व प्रशासनाचे अभिनंदन करून रुग्णांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news