

कोल्हापूर : कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील रुग्णांसाठी प्रमुख आधारवड असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाला (सीपीआर) सध्या चोरांनी विळखा घातला आहे. येथील ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेमुळे डॉक्टर, कर्मचारी, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत. लॅपटॉप, मोबाईल, पैशाच्या बॅगा लंपास होण्याच्या घटनांत वाढ झाल्याने रुग्णालयात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सीपीआरमधील वाढत्या चोर्या रोखण्यासाठी 2016 मध्ये महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांकडे सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली होती. सुरुवातीला याचा चांगला परिणाम दिसून आला आणि भुरट्या चोर्यांवर नियंत्रण आले होते. मात्र, आता ही सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे ढिली पडल्याचे चित्र आहे. पंधरा दिवसांपूर्वी एका डॉक्टरचा लॅपटॉप चोरीला गेला, तर रुग्णांच्या नातेवाईकांचे मोबाईल आणि बॅगा चोरीला गेल्या आहेत. सुरक्षा जवान काही चोरांना पकडत असले तरी चोर्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. रुग्णालयाच्या आवारात विविध इमारतींची कामे सुरू असून, येथील भंगार साहित्याचीही मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. दोन महिन्यांपूर्वी मोठ्या भंगार चोरीची घटना घडली होती. वॉर्ड, निवारा शेड, अपघात विभाग आणि बाह्यरुग्ण नोंदणी कक्षात ठेवलेल्या साहित्यावर चोरटे डल्ला मारत आहेत.
दारूडे आणि बेवारसांचा आश्रय
रुग्णालयाच्या आवारात दारूडे, बेवारस आणि निराधारांनी मोठ्या प्रमाणात आश्रय घेतला आहे. वॉर्डच्या रॅम्पवर, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या पोर्चमध्ये आणि निवारा शेडमध्ये त्यांनी बस्तान मांडले आहे. त्यांच्या वाढत्या वावरामुळे रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. प्रशासनाने त्यांना महापालिकेच्या निवारा केंद्रात स्थलांतरित करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही बंद
सीपीआर परिसरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. याचाच फायदा चोरटे उचलत आहेत. गेल्या वर्षी सायकल आणि दुचाकी चोरीचा छडा याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लागला होता. त्यामुळे सर्व कॅमेरे तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.