

कोल्हापूर : जुना बुधवार पेठेतील निवृत्त फायरमन कृष्णात चौगले यांचा शनिवारी सीपीआरमध्ये मृत्यू झाला. त्यानंतर तेथे गोंधळ निर्माण झाला होता. उपचारात ब्रदरनी हलगर्जीपणा केल्यामुळेच चौगले यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. या घटनेची सीपीआर प्रशासनाने चौकशी केली. ब्रदर अमोल भोपळे व नेल्सन श्रीसुंदर यांनी रुग्णाला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. यामध्ये कोणताही हलगर्जीपणा किंवा गैरवर्तन त्यांच्याकडून झालेले नाही. वॉर्डमध्ये नातेवाईकांनी कर्मचार्यांना धमक्या देऊन अरेरावी करत शिवीगाळ केल्याचे चौकशीत निदर्शनास आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी दिली.
चौगले यांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यांच्यावर दूधगंगा इमारतीमधील चौथ्या मजल्यावरील वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. शनिवारी दुपारी हृदयविकाराचा तीव— झटका आल्याने ते बेशुद्ध पडले. ब्रदर भोपळे व श्रीसुंदर यांच्या लक्षात येताच त्यांनी वैद्यकीय अधिकार्यांच्या सल्ल्यानुसार तातडीचे उपचार सुरू केले. त्यातच चौगले यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस फेडरेशन, महाराष्ट्र राज्य नर्सेस संघटनेने अधिष्ठाता कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
संघटनेच्या पदाधिकार्यांनी अधिष्ठाता डॉ. मोरे यांची भेट घेऊन ब्रदरना धमकी आणि अरेरावी करणार्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस फेडरेशनच्या हशमत हावेरी, पूजा शिंदे, ज्ञानेश्वर मुठे, मनोज चव्हाण, योगेश यादव, पल्लवी रेणके, जॉय यमल यांच्यासह परिचारिका, ब्रदर उपस्थित होते.