

कोल्हापूर : सीपीआरच्या हृदय शस्त्रक्रिया विभागाने अपघातात जखमी झालेल्या व फुफ्फुस तुटलेल्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला पुनर्जन्म दिला. तरुणाची प्रकृती पूर्ववत झाली असून, त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशा प्रकारची ही भारतातील पहिलीच शस्त्रक्रिया असल्याची माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे व डॉ. किशोर देवरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
कळे (ता. पन्हाळा) येथील सोहम माळवे पुण्याला नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी जात होता. किणी येथे त्याची दुचाकी दुभाजकाला धडकली. त्याच्या छातीला जोराचा मार लागला. वेदना होऊ लागल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावरील उपचारांचा खर्च मोठा सांगितला. घरची परिस्थिती बिकट असल्याने त्याची बहीण श्रुती पट्टण हिने त्याला 30 नोव्हेंबरला सीपीआरमध्ये दाखल केले. त्याचे सीटी स्कॅन केले असता उजव्या फुफ्फुसाची श्वासनलिका पूर्णपणे तुटल्याचे निदान झाले. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत होता.
श्वासनलिका तुटल्याने रुग्णास व्हेंटिलेटरवर ठेवणे, भूल देणे शक्य नव्हते. शरीरातील ऑक्सिजनची पातळी 30 टक्के होती. त्यामुळे शस्त्रक्रिया करणे आव्हान होते. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. किशोर देवरे यांनी शस्त्रक्रियेसाठी हार्ट लंग उपकरणाचा वापर केला. रुग्णाला जागे ठेवून ‘फेमोरो फेमोरल बायपास’ करून प्रथम हार्ट लंग मशिनवर ठेवले. त्यामुळे त्याची श्वासनलिका सुरळीत झाली. त्यानंतर छाती उघडून तुटलेली श्वासनलिका विशिष्ट धागे वापरून शिवण्यात आली. तब्बल 4 तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. 15 दिवसांच्या उपचारांनंतर त्याला घरी सोडण्यात आले.
पत्रकार बैठकीला वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे, समाजसेवा अधीक्षक शशिकांत राऊळ होते. वैद्यकीय पथकात डॉ. भूपेंद्र पाटील, डॉ. माजीद मुल्ला, भूलतज्ज्ञ डॉ. हेमलता देसाई, डॉ. संदीप मोहिते, डॉ. पल्लवी पवार, दीपाली जाधव, रेखा पाटील, परफ्यूजनिस्ट अरुण पाटील, रॉजर कदम, विनोद पवार, अभिजित समुद्रे, अमोल ब्रदर, नितीन पोफळकर, सचिन जठार, नीलेश कांबळे यांचा समावेश होता.