कोल्हापूर ः छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या (सीपीआर) परिसरातील बेकायदेशीर 16 अतिक्रमणे रविवारी न्यायालयाच्या आदेशाने हटवण्यात आली. काही टपर्याही सील केल्या. सीपीआर प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने पोलिस बंदोबस्तात ही कारवाई केली. काही जणांची अरेरावी झुगारून प्रशासनाने सीपीआरला अतिक्रमणाच्या विळख्यातून बाहेर काढले. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.
सकाळी सात वाजता पोलिसांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दोन ट्रॅक्टर, जेसीबी आणि 25 कर्मचार्यांचा फौजफाटा घेऊन सीपीआरमध्ये दाखल झाले. सुरुवातीला संबंधित टपरीधारकांना साहित्य काढून घेण्याची सूचना केली. मात्र, अनेक वर्षांपासून येथे असणार्या टपरीधारकांनी डोळ्यात पाणी आणत टपरी सोडण्यास विरोध केला. प्रशासनाने कायदेशीर आदेश आहे, त्यामुळे अतिक्रमणे काढावीच लागतील, असे सांगितले. काही टपरीधारकांनी स्वतःहून साहित्य, टपर्या, हातगाडे काढून घेतले. यानंतर येथे साचलेली खरमाती जेसीबीच्या सहाय्याने काढली. अतिक्रमणे काढण्यास विरोध करणार्या टपरीधारकांना पोलिसांनी सुनावले. त्यानंतर त्यांनी आपला बिस्तारा गुंडाळला.
सीपीआरच्या प्रसूती विभागापासून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली. येथील अतिक्रमणे काढल्यानंतर दूधगंगा - वेदगंगा इमारतीच्या समोर असणार्या टपर्यांवर हातोडा घातला. यानंतर अतिक्रमण पथकाने कर्मचारी निवासस्थान येथील इमारती कुलूप लावून सील केल्या. येथील चहाची गाडी व टपरी काढली. मुख्य प्रवेशद्वार येथील दगडी बिल्डिंगसमोरील टपर्या हटविल्या. एक हॉटेल कुलूपबंद केले. यानंतर अपघात विभागाबाहेरील झेरॉक्स सेंटरवर मोहीम सरकली. सुरुवातीला झेरॉक्स सेंटर काढणार नाही, अशी भूमिका घेतली. पोलिसांनी संबंधिताना सूचना केल्यानंतर साहित्य हटवण्यात आले. साडेअकरा वाजता आमदार राजेश क्षीरसागर सीपीआर येथे आले. त्यांनी अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्याशी कारवाईबाबत चर्चा केली. आ. क्षीरसागर म्हणाले, परिसरातील अतिक्रमणे हटविली पाहिजेत. पण गरिबांच्या पोटावर मारू नये. त्यांना उघड्यावर पाडू नका. त्यांच्यावर अन्याय होऊ नये. प्रशानाने त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे. त्यासाठीचा प्रस्ताव द्या. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, शहाजी कांबळे, रूपा वायदंडे, ऋतुराज क्षीरसागर, अभिजित राऊत उपस्थित होते.