

कोल्हापूर : सीपीआर कार्यालयीन अधीक्षक अजय गुजर यांची सिंधुदुर्ग येथे तडकाफडकी बदली झाली. या बदलीसाठी दिलेले कारण कार्यालयीन असले, तरी त्या मागे विविध कारणे आहेत. त्यापैकी बोगस दरकराराद्वारे सीपीआरमधील सुमारे आठ कोटी रुपयांचे टेंडर मिळवणार्या मयूर लिंबेकर प्रकरणाची छाननीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे गुजर यांची तडकाफडकी बदलीमुळे वैद्यकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
सीपीआरमध्ये गेल्या तीन ते चार वर्षांत अनेक निविदा प्रक्रिया राबविल्या आहेत. यामधील अनेक निविदा प्रक्रियेत नियमांना केराची टोपली दाखविली आहे. ठरावीक पुरवठादारांना निविदा मिळवून देण्यासाठी सीपीआरमध्ये काहींनी खटाटोप केला. चौकशीमध्ये यामधील काही दोषी आढळले आहेत. अजून अनेक प्रकरणांची तपासणी सुरू आहे.
यातील मयूर लिंबेकर याने 4 कोटी 28 लाख रुपयांचे टेंडर मुलुंड आणि वरळी रुग्णालयांची खोटी दरपत्रे जोडून मिळवल्याचे पुढे आले. या संपूर्ण प्रकरणाचे विशेष लेखापरीक्षण करावे, असे प्रशासकीय अधिकारी गुजर यांनी वरिष्ठ कार्यालयास पत्र पाठविले होते. यामुळेच त्यांची बदली सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यालयीन अधीक्षक म्हणून केली असावी, अशी चर्चा सुरू झाली आहे. गुजर यांच्या जागी मानसिंग जगताप हे नवे प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यभार घेणार आहेत.