कोल्हापूर : गाय दूध खरेदी दरात तीन रुपयांनी कपात करण्याचा निर्णय खासगी व सहकारी दूध संघ तसेच कोल्हापूर विभागातील डेअरी प्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला. गाय दुधाला प्रतिलिटर 33 रुपये दर दूध उत्पादक शेतकर्याला मिळत होता, तो या निर्णयामुळे 30 रुपये मिळणार आहे. या बैठकीत दूध पावरडचे भाव, लोणी, दूध बाजारातील खरेदी-विक्रीचे दर यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाने ऑक्टोबरपासून गाय दूध खरेदीचा 3.5 फॅट व 8.5 एसएनएफकरिता किमान प्रतिलिटर दर 28 रुपये केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात इतर दूध संघ 27 ते 28 रुपये दराने गाय दूध खरेदी करत आहेत. फक्त कोल्हापूर जिल्ह्यात 33 रुपये अधिक अंतिम दूध दर फरक, असे जवळपास 6 रुपये जास्त दराने गाय दूध खरेदी करण्यात येत होते.
लोणी, दूध भुकटी उत्पादनाचा खर्च अधिक असल्याने बाजारामध्ये त्याची स्पर्धात्मक दराने विक्री करू शकत नाही. तसेच सध्या दूध मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. येथून पुढेदेखील गाय दुधाची उपलब्धता चांगली असणार आहे; परंतु दूध भुकटी व लोण्याच्या विक्री किमतीत कोणतीही वाढ होताना दिसत नाही.अशा परिस्थितीत दूध खरेदी दर कमी करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने गाय दूध खरेदी दरात कपात करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, या निर्णयामुळे गाय दूध खरेदी दर 3.5 फॅट व 8.5 एसएनएफकरिता 33 रुपयांऐवजी 30 रुपये इतका राहणार आहे. बैठकीस गोकुळ, राजारामबापू दूध संघ, वारणा दूध संघ, भारत डेअरी व इतर दूध संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.