

कोल्हापूर : जिल्ह्यात पुन्हा कोरोनाबाधित रुग्ण सापडू लागले असून आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. मात्र, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (सीपीआर) प्रशासनाने घेतलेला निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कोयना इमारतीमध्ये असणार्या बालरोग विभागाच्या तिसर्या मजल्यावर कोरोना रुग्णांसाठी वॉर्ड सुरू करण्यात आला आहे. प्रशासनाच्या या अजब कारभारामुळे बालकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. बालरोग विभागातून कोरोना वॉर्डचे तत्काळ स्थलांतर करावे, अशी मागणी बालरुग्णांसह नातेवाईकांमधून होत आहे.
कोरोनाच्या पहिल्या, दुसर्या लाटेत सीपीआरमधील सर्व वॉर्ड कोरोना बांधित व संशयित रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. या आजाराची तीव—ता कमी झाल्यानंतर दगडी इमारतीमधील क्षयरोग व उरोग विभागात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात होते. मात्र, मे महिन्यात अवकाळी पावसामुळे वेदगंगा इमारतीतील अपघात विभागाला गळती लागली. त्यामुळे अपघात विभागाचे स्थलांतर थेट कोरोनासाठी राखीव ठेवलेल्या दगडी इमारतीमध्ये करण्यात आले.
त्यानंतर कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने सीपीआर प्रशासनाने चक्क ‘कोयना’ इमारतीमधील बालरोग विभागाच्या तिसर्या मजल्यावर कोरोना बाधित व संशयित रुग्णांसाठी वॉर्ड सुरू केला आहे. या ठिकाणी जाण्यासाठी एकच जिना आहे. याच जिन्यावरून बालरोग विभागातील रुग्ण, कोरोनाबाधित रुग्ण, नातेवाईक ये-जा सुरू आहे. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला असून बालकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या प्रकारावर अनेक नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘कोरोनाच्या पहिल्या व दुसर्या लाटेचा सीपीआरला अनुभव असूनही, प्रशासनाने बालकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारा निर्णय का घेतला?’ असा सवाल उपस्थित केला जात आहे. अनेक पालकांनी वॉर्ड त्वरित स्थलांतरित करावा, अशी मागणी केली आहे. तसेच जिथे कोरोना वॉर्ड असेल, तिथे स्पष्ट पाटी लावावी. जेणेकरून अन्य रुग्ण तेथे जाणार नाहीत. कोरोना वॉर्ड तत्काळ बालरोग विभागापासून दूर स्थलांतरित करून योग्य ती खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.
शेंडा पार्क येथील महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये कोरोना कक्ष सुरू केला तर अधिक सोयीचे होऊ शकते. कोरोना महामारीमध्ये आयसोलेशनमध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यासाठी सीपीआर प्रशासन आणि महापालिका आरोग्य विभागाने समन्वय ठेवण्याची गरज आहे. महापालिका आरोग्य विभागाने आयसोलेशन हॉस्पिटल देखील कोरोना रुग्णांवर उपचारासाठी तैनात ठेवले आहे. मात्र, इकडे रुग्णच जात नाहीत.