

कोल्हापूर : ज्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांना पुरेसे विद्यार्थी मिळत नाहीत, असे विषय संबंधित महाविद्यालयांमध्ये बंद करण्यास शिवाजी विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच पदव्युत्तर अभ्यास केंद्रांमध्ये जर क्षमतेपेक्षा 25 टक्क्यांपेक्षा कमी विद्यार्थी संख्या असेल, तर त्या केंद्रांना बंद करण्यासाठी नोटीस देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. शिवाजी विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते.
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील अनेक महाविद्यालयांमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबरच व्यावसायिक व कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने घटत आहे. बी.ए. मल्टिमीडिया, नॉन व्होकेशनल, बी.बी.एम., एम. टेक., आर्किटेक्चर, नर्सिंग आदी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश कमी झाल्याने काही महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे संबंधित विषय बंद करण्याचे प्रस्ताव पाठवले होते. या प्रस्तावावर चर्चा करून विद्या परिषदेने मान्यता दिली आहे .
बीडशेड (ता. करवीर) येथील सूर्यकांत सदाशिव दिंडे महाविद्यालयाच्या चौकशी अहवालात त्रुटी असल्याने समितीला फेर अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले. कळे येथील विठ्ठलराव पाटील महाविद्यालयाची विनाअनुदानित तुकडी काढून घेण्याचा पूर्वीचा निर्णय कायम ठेवण्यात आला.
वालचंद कॉलेज : एम.फिल., बॉटनी, फिजिक्स
कस्तुरबा पाटील कन्या महाविद्यालय : झूलॉजी
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड : एम.टेक. अभ्यासक्रम
बी.ए. स्पोर्टस्, बी.ए. फिल्म मेकिंग : सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यास मंजुरी
बी.टेक. फूड टेक्नॉलॉजी : प्रवेश क्षमतेत 60 वरून 30 जागा
एकूण 35 पैकी 25 ठरावांना मंजुरी