

कोल्हापूर : साने गुरुजी वसाहतीमधील लोकल मार्टमध्ये खरेदीच्या बहाण्याने प्रवेश करून 20 हजार रुपये किमतीच्या साहित्याची चोरी करणार्या शास्त्रीनगर येथील दाम्पत्याला जुना राजवाडा पोलिसांनी शनिवारी अटक केली. परवेज दिलावर शिलेदार (वय 45) व करिश्मा परवेज शिलेदार (40, रा. रेसिडेन्सी कॉलनी, कोल्हापूर) अशी नावे आहेत.
लोकल मार्ट व्यवस्थापक केतन पाटील यांनी फिर्याद दिली होती. दि.22 फेब—ुवारीला सायंकाळी संशयित दाम्पत्य साने गुरुजी वसाहत येथील संजय घोडावत ग्रुप कंपनीच्या लोकल मार्टमध्ये खरेदीच्या बहाण्याने आले होते. संशयित महिलेने ड्रेसच्या कप्प्यामध्ये साहित्य लपविले. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद होत होता. काहीकाळाने दाम्पत्य 20 हजार रुपये किमतीच्या साहित्यासह मॉलमधून पसार झाले. शाखा व्यवस्थापकांनी दाम्पत्याच्या पार्किंग केलेल्या मोटार क्रमांकाच्या आधारे त्याची नावे निष्पन्न केली. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिस निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक संतोष गळवे, हवालदार प्रशांत घोलप, सागर डोंगरे, सतीश बांबरे आदींनी दाम्पत्याचा छडा लावून त्यांना अटक केली. संशयितांकडून 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.