

कोल्हापूर : शिवसेनेचे नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर हे काही दिवसांपूर्वी गोव्यातील कॅसिनोत गेले होते. तेथे ते टेबलवर बसून जुगार खेळत होते, असा आरोप ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी गुरुवारी (दि. ४) व्हिडीओ क्लीप दाखवून पत्रकार परिषदेत केला. याप्रकरणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
इंगवले म्हणाले, कोल्हापूर शहरामध्ये गांजा, जुगार, मॅच बेटिंग यामुळे नवीन पिढी बरबादीकडे पाऊल टाकत आहे आणि याच शहरातील आमदारांचे सुपुत्र खुलेआम कॅसिनो खेळत असतील, तर त्यांच्याकडून समाजाने काय बोध घ्यायचा? दहा दिवसांपूर्वी माझ्या मित्रांच्या सहकार्यातून व्हिडीओ माझ्या हाती लागला. त्यात कॅसिनोत एका टेबलवर बसून ऋतुराज क्षीरसागर जुगार खेळताना दिसत आहेत.
ईव्हीएमच्या माध्यमातून विजय सरदार यांचा पराभव झाला; अन्यथा ऋतुराज पराभूत झाले असते. शिवसेनेच्या माध्यमातून महापालिकेत खून करणारे, जुगार खेळणारे नगरसेवक झाले; पण नेमका विकास कधी व कोणाचा हे प्रश्नचिन्हच आहे. तसेच, आ. क्षीरसागर यांंच्या टक्केवारीमुळेच कोल्हापूरचा विकास खुंटला असून, शहर भकास होत असल्याचा आरोपही इंगवले यांनी केला.
ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करून आमदार राजेश क्षीरसागर कुटुंबीयांना बदनाम करण्याचे षड्यंत्र रचतात. त्यांच्या म्हणण्याकडे जास्त लक्ष देत नाही. परंतु त्यांनी केलेल्या आरोपाला आता कायदेशीर चोख उत्तर देऊ, असा इशारा नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
शिवसेनेत २०२२ मध्ये फूट पडल्यापासून इंगवले हे फक्त आ. क्षीरसागर कुटुंबावर टीका करत आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांनी पेन ड्राईव्हचे राजकारण करून खाेटे आरोप केले. क्षीरसागर कुटुंबीयांवर बिनबुडाचे आरोप करण्याशिवाय त्यांना काही काम उरलेले नाही. महापालिका निवडणुकीतही त्यांनी पत्रकबाजी केली. परंतु आम्ही दोघेही मताधिक्याने निवडून आलो, असेही क्षीरसागर यांनी सांगितले.