

राजेंद्र जोशी
कोल्हपूर : जागतिक भूराजकीय अस्थिरता, अमेरिकन फेडरलने अनुसरलेले व्याजदर कपातीचे धोरण आणि डॉलर्सच्या तुलनेत रुपयाची उच्चांकी घसरण यामुळे भारतात सोने-चांदीचे भाव वेगाने वाढू लागले आहेत. याचा परिणाम सोने-चांदीच्या दागिन्यांच्या उद्योगावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. परंतु, त्याचबरोबर जगभरात तांबे, पितळ, अॅल्युमिनियम या धांतूंच्या किमतींमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तांबे 40, तर पितळ आणि अॅल्युमिनियम अनुक्रमे 16 आणि 20 टक्क्यांनी वधारले आहे. यामुळे या धातूंचा वापर करणार्या उद्योगांपुढेही संकट उभे राहिले आहे.
भारतामध्ये चांदीच्या दराने प्रतिकिलो दोन लाखांचा टप्पा केव्हाच पार केला. एका वर्षात चांदीच्या किमतीमध्ये तब्बल 149 टक्क्यांची वाढ झाली, तर सोने दराने तब्बल 70 टक्क्यांची झेप घेत 24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमसाठी 1 लाख 30 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. जागतिक बाजारात आता सोने प्रतिऔंस 4,500 डॉलर्सच्या पुढे गेले आहे. आता तांबे, पितळ आणि अॅल्युमिनियम या धातूंच्या दराच्या आलेखानेही व्यापारी उद्योगात खळबळ माजली आहे. गेल्या वर्षाच्या डिसेंबर महिन्याच्या तुलनेत तांब्याच्या किमतीत तब्बल 40 टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. पितळ 20 टक्क्याने वधारले आहे, तर अॅल्युमिनियमच्या किमती 16 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
भारतीय वायदे बाजारात सोने-चांदी वगळता मूलभूत धातूंमध्ये तांबे गुंतवणूकदारांना सर्वाधिक नफा मिळवून देणारा धातू म्हणून पुढे आला आहे. इलेक्ट्रिक वाहने, अक्षय ऊर्जा प्रकल्पांच्या जलद वाढीमुळे तांबे आणि अॅल्युमिनियमची मागणी प्रचंड वाढती आहे. या दरवाढीला जसा वाढता वापर कारणीभूत आहे, तसे चिलीच्या खाणींमधील अपघात व इतर तांबे पुरवठादार देशांतील उत्पादन घटीमुळे तांब्याचा दरही वाढतो आहे. शिवाय, त्याचा तुटवडाही भासतो आहे. याखेरीज अॅल्युमिनियमच्या उत्पादनासाठी ऊर्जा आणि भांडवली खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे अॅल्युमिनियमच्या दरामध्ये वाढ होते आहे. बाजारात तांब्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. त्याचा दर आता 1,600 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
हुपरीजवळील 40 गावांतील कामावर दरवाढीचा परिणाम
सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या उद्योगावर सुमारे 80 लाख इतके मनुष्यबळ अवलंबून आहे. शिवाय, देशात या वस्तूंच्या विक्रीसाठी सुमारे 3 लाखांहून अधिक छोट्या-मोठ्या पेढ्या कार्यरत आहेत. तेथे काम करणारे मनुष्यबळ लक्षात घेतले, तर काही कोटी कुटुंबे या उद्योगावर अवलंबून आहेत. कोल्हापुरातील हुपरी ही चांदीच्या दागिन्यांची देशातील मोठ्या बाजारपेठेपैकी प्रमुख म्हणून ओळखली जाते. तेथे हजारो कामगार काम करतात. हुपरी शेजारील सुमारे 40 गावांत घरोघरी चांदीच्या वस्तू तयार करण्याचे काम केले जाते. तेथे क्षमतेच्या तुलनेत काम 20 टक्क्यांवर खाली आले आहे.