CPR Hospital | ‘त्या’ केबीनप्रश्नी तोडगा कधी? वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ काय निर्णय घेणार याकडे लक्ष

CPR Hospital |
CPR Hospital | ‘त्या’ केबीनप्रश्नी तोडगा कधी? वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ काय निर्णय घेणार याकडे लक्ष
Published on
Updated on

कोल्हापूर : सीपीआर येथील जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबीनवरून गेल्या चार दिवसांपासून वाद उफाळला आहे. त्यामुळे सीपीआर चांगलेच चर्चेत आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकार्‍यांना केबीन बाबत घाई गडबड करू नये, शांत राहावे, अशा सूचना केल्या आहेत. शुक्रवारी (दि. 29) वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सीपीआरमधील विविध विभागांचे लोकार्पण होणार आहे. मंत्री मुश्रीफ या केबीनबाबत काय तोडगा काढणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

सीपीआर येथे विविध इमारतींच्या नूतनीकरणाची कामे सुरू आहेत. येथील हेरिटेज इमारतीमधील आस्थापना कार्यालय, विविध विभागांची कामे सुरू आहेत. याच इमारतीमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक यांची केबीन आहे. नूतनीकरणामुळे त्यांचे कार्यालय स्थलांतरित केले आहे. या केबीनवरून गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा शल्यचिकित्सक व अधिष्ठाता यांच्यात वाद सुरू आहे. सध्या त्या केबीनचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. या केबीनमध्ये वैद्यकीय अधीक्षक फलक लावला आहे. त्यामुळे पुन्हा वादाला तोड फुटले आहे. सोमवारी (दि. 25) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात यांनी संबंधित केबीनचा ताबा घेतला. तर पुन्हा मंगळवारी (दि. 26) अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी कार्यालयाला कुलूप लावून बेरिकेडस् लावले. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक आणि अधिष्ठाता यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. या दोन्ही अधिकार्‍यांना शांत राहा, घाई करू नका, अशा सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत.

सीपीआरमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक केबीन हवी

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून रुग्ण, नातेवाईक विविध कामानिमित्त सीपीआर येथे येतात. सर्वांच्या सोयीच्या द़ृष्टीने जिल्हा शल्यचिकित्सक यांची केबीन सीपीआरमध्ये असावी, अशी मागणी सीपीआर कृती समितीसह रुग्ण, नातेवाईकांची आहे. मंत्री हसन मुश्रीफ काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news