

कोल्हापूर : गणरायाच्या आगमनादिवशी राजारामपुरीत काढण्यात आलेल्या आगमन मिरवणुकीत एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणलेला ‘आवाज सोडतो... काचा फोडतो.. सगळं कसं वजनात’ असा फलक मंडळाला महागात पडला. मंडळाच्या अध्यक्षाला राजाराममपुरी पोलिसांनी बोलावून घेत ‘समज’ दिल्यानंतर त्याने जाहीर माफी मागितली. पुन्हा असा प्रकार आपल्या हातून घडणार नाही, असे लिहून दिल्यानंतर त्याला सोडण्यात आले; परंतु हे प्रकरण सर्वच मंडळाला महागात पडल्याची चर्चा सुरू आहे.
राजारामपुरीतील गणेश तरुण मंडळाने वरील मजकुराचा फलक मिरवणुकीत आणला होता. या फलकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. या फलकावर पोलिसांचीही नजर गेली; परंतु यावेळी कार्यकर्ते तानात होते. मिरवणूक झाल्यानंतर मंडळाचा अध्यक्ष सोहम प्रताप पाटील याला राजारामपुरी पोलिसांनी बोलावून घेतले. त्याच्यासोबत मंडळाचे काही कार्यकर्तेही होते. पोलिसांनी त्यांना ‘समजून’ सांगितल्यानंतर त्यांना आपली चूक कळाली. त्यांनी जाहीर माफी मागितल्यानंतर पोलिसांनी सोडून दिले.