kolhapur | भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा; अन्यथा अधिकाऱ्यांवर कारवाई

राज्य शासनाचे महापालिका, नगरपालिकांना आदेश; तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांक सुरू करा
Pune Stray Dog Attack
kolhapur | भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा; अन्यथा अधिकाऱ्यांवर कारवाईPudhari File Photo
Published on
Updated on

अनिल देशमुख

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखणे आणि त्यांचा बंदोबस्त करण्याबाबत दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. तसे आदेश राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने ८ जुलै रोजी सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींना दिले. या आदेशाचे पालन न केल्यास ‘न्यायालयाचा अवमान’ समजले जाईल, असा दमही नगरविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना भरला आहे. भटक्या श्वानांच्या तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांकही तत्काळ सुरू करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

प्राणी जन्म नियंत्रण नियम, २०२३ हा २० मार्च २०२५ पासून सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लागू करण्यात आला आहे. त्यानुसार भटक्या जनावरांमुळे मानवाच्या दैनंदिन जीवनात होणारा उपद्रव तसेच मानव-श्वान संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. दरम्यान, सु-मोटो रिट याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दि. १९ मे, २०२६ रोजी दिलेल्या अंतरिम निर्णयानुसार नगरविकास विभागाने सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींना भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणाबाबत कार्यवाही करण्याचे पुन्हा आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट ‘न्यायालयाचा अवमान’ अंतर्गत कारवाई केली जाईल, असा इशाराही शासनाने दिला आहे.

अतिआक्रमक कुत्र्यांना ‘दयामरण’

ज्या भागात भटक्या कुत्र्यांची संख्या चिंताजनक आहे किंवा श्वानदंशाच्या घटनांमुळे सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे, तिथे पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने रेबीजग्रस्त, असाध्य आजारी किंवा अतिशय आक्रमक कुत्र्यांना कायदेशीर तरतुदींचे पालन करून ‘दयामरण’ देण्यात येणार.

गर्दीच्या ठिकाणी तत्काळ कार्यवाही करा

शैक्षणिक संस्था, रुग्णालये, क्रीडा संकुल, बसस्थानक, रेल्वेस्थानक यासह गर्दीच्या सार्वजनिक परिसरात आढळणाऱ्या सर्व भटक्या श्वानांना ताबडतोब पकडा. त्यांना निर्बीजीकरण व लसीकरणानंतर स्थापित निवारागृहामध्ये हलवा. तसेच, अशा भटक्या श्वानांना पुन्हा त्याच ठिकाणी सोडले जाणार नाही, याची दक्षता घ्या, असेही या आदेशात म्हटले आहे.

‘या’ दिल्या प्रमुख सूचना

भटक्या श्वानांना पकडून निर्बीजीकरण, लसीकरण व जंतनिर्मूलन करा.त्यांच्या आश्रय, निवाऱ्याची सोय करा, त्यांना खाऊ घालण्याच्या जागा निश्चित करा.

त्याचजागी खायला दिले जाईल याची खात्री करा. याचे पालन न झाल्यास कारवाई करा. भटक्या श्वानांच्या तक्रारी संदर्भात हेल्पलाईन क्रमांक तयार करा.

कुत्रा चावल्यानंतरच्या उपचार व प्रतिबंधात्मक उपायांची जन-जागृती करा. भारतीय जीव जंतू कल्याण मंडळांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा. शाळा, रुग्णालये, विमानतळ या ठिकाणी निर्बीजीकरण, लसीकरणानंतर कुत्र्यांना परत सोडू नका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news