

कोल्हापूर : गुंड सूरज साखरेवरील गोळीबाराचा मुख्य सूत्रधार महापालिकेचा ठेकेदार गणेश रमेश खाडे (रा. लक्षतीर्थ वसाहत) असल्याचे तपासात समोर आले. महापालिका निवडणूकीत विरोधी उमेदवाराचा प्रचार तसेच रस्त्याचे काम बंद पाडून कंपनीस ब्लॅकलिस्ट केल्याच्या रागातून साखरेचा गेम करण्याची सुपारी गणेशने दिली होती. पिस्तूल खरेदीसाठी १ लाख ॲडव्हान्स व हल्ल्यानंतर संशयितांची सर्व जबाबदारीही खाडेने घेतल्याची कबुली संशयितांनी दिली.
साखरे आणि खाडे एकेकाळी एकमेकांचे जिवलग मित्र होते. मनपा निवडणुकीतील राग महापालिका प्रभाग क्रमांक आठ क मधून गणेश खाडे विरुद्ध हेमंत कांदेकर निवडणूक रिंगणात होते. साखरेने कांदेकर यांचा प्रचार केला होता. मतदानादिवशीही बूथवर थांबण्यापासून सर्वच गोष्टीत तो पुढे होता. याचीच खदखद खाडेच्या मनात होती.
आंदोलन करून काम बंद पाडल
खाडे मनपाचा नोंदणीकृत ठेकेदार असून, संगीता कन्स्ट्रक्शन नावाने असलेल्या कंपनीच्या माध्यमातून देवकर पाणंद येथील रस्त्याचे काम घेतले होते. हे काम निकृष्ट असल्याचा आरोप करत साखरेने हे बंद पाडले होते. यामुळे खाडेची कंपनी ब्लॅकलिस्ट झाली होती.
१ लाख ॲडव्हान्स अन् जबाबदारी
साखरे आणि खाडे पूर्वी एकमेकांचे खास मित्र होते. कालांतराने काही घरगुती कारणामुळे या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण होऊन त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. गणेशने १ लाख रुपयांचा ॲडव्हान्स देऊन साखरेचा गेम वाजवण्याची सुपारी देण्यापर्यंत हा वाद वाढला. हल्ल्यानंतर हल्लेखारांची सर्व व्यवस्था करण्याचा शब्दही खाडेने दिला होता.