Sangli Fata Uchgaon bridge | सांगली फाटा-उचगाव पिलर पुलासाठी ठेकेदार निश्चित

अनामत रक्कम भरण्याचे आदेश; महापुराचा धोका टळणार
Sangli Fata Uchgaon bridge |
Sangli Fata Uchgaon bridge | सांगली फाटा-उचगाव पिलर पुलासाठी ठेकेदार निश्चित
Published on
Updated on

सुनील सकटे

कोल्हापूर : महापुराचा धोका टाळण्यासाठी सांगली फाटा ते उचगाव आणि कागल येथे पिलर पुलासाठी ठेकेदार निश्चित झाला आहे. संबंधित ठेकेदारास स्वीकृती पत्राद्वारे अनामत रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत. दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून पिलर पुलाबाबत आग्रही भूमिका घेऊन हा प्रश्न मार्गी लावला.

कोल्हापूरला सातत्याने महापुराचा फटका बसत आहे. 2019 मध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला होता. महामार्गावर पाणी आल्याने महामार्ग आठ दिवस बंद झाला होता. भरावाच्या पुलामुळे पुराच्या पाण्याचा निचरा होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे पिलर पुलाची मागणी झाली. यासंदर्भात दै. ‘पुढारी’ने सातत्याने आवाज उठवून हा प्रश्न लावून धरला आहे.

सांगली फाटा ते उचगाव या पिलरच्या उड्डाणपुलासाठी साडेसातशे कोटींची तर कागल येथे पिलर पुलासाठी 300 कोटींची निविदा प्रसिद्ध झाली. या दोन्ही कामांसाठी ठेकेदार निश्चित केला आहे. संबंधित ठेकेदारास अनामत रक्कम भरण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले आहेत. अनामत रक्कम भरल्यास तत्काळ वर्कऑर्डर दिली जाणार आहे. सांगली फाटा-उचगाव हा 5 किमी लांबीचा उड्डाणपूल असून विशिष्ट आकाराचे पिलर उभारण्यात येणार आहेत. पंचगंगा नदीवर मोठा पूल बांधण्यात येणार आहे. उचगाव येथे लहान पूल आणि रेल्वे पुलाचा समावेश आहे. नागरिकांसाठी भुयारी मार्गाचेही नियोजन करण्यात आले आहे. पिलर पुलामुळे महापुराच्या पाण्याचा तातडीने निचरा होण्यास मदत होणार आहे. कागल येथे अडीच कि.मी.चा पिलर पूल असून कागल शहरात प्रवेश करण्यासाठी सेवा मार्गासह दोन्ही बाजूला सेवा मार्ग होणार आहेत.

दै. ‘पुढारी’च्या पाठपुराव्यास यश

सांगली फाटा ते उचगाव या मार्गावर भिंतीऐवजी पिलरचा पूल उभारण्यात यावा यासाठी दै. ‘पुढारी’ने सातत्याने आवाज उठविला आहे. या कामासाठी ठेकेदार निश्चित झाल्याने दै. ‘पुढारी’च्या पाठपुराव्यास यश आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news