

कोल्हापूर : अनैतिक संबंधाच्या संशयातून सराईत गुंड सूरज हणमंत साखरे (वय ३७, रा. श्रीकृष्ण कॉलनी, संभाजीनगर) याचा काटा काढण्यासाठीच सुपारी दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या गोळीबारप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अवघ्या १२ तासांत शूटरसह साथीदाराला जेरबंद केले. दुचाकीसह कर्नाटकात पलायनाच्या तयारीत असताना जयसिंगपूर येथील अंकली पुलाजवळून शुक्रवारी पहाटे दोघांना अटक केली.
रफिक ऊर्फ देवा पीरसाहेब मुल्ला (वय ३९, रा. शाहू कॉलनी, विक्रमनगर), शहबाज राजू मुल्ला (वय २३, रा. मणेर मळा) यांना अटक करण्यात आली. शनिवारी सकाळी या दोघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. याबाबतची फिर्याद आशुतोष अमित नाईक (वय २७, रा. पुलाची शिरोली) यांनी दिली. 'मोका'अंतर्गत कारवाईतून बाहेर आलेला सराईत गुंड सूरज साखरेवर गुरुवारी (दि. १६) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास क्रांतिसिंह नाना पाटीलनगर परिसरात गोळीबार झाला होता.
देवाने केले फायरिंग
देवा आणी शहबाज या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू केली. दोघांनी गोळीबाराची कबुली देत देवाने फायरिंग केल्याचे कबूल केले, तर शाहबाज दुचाकी चालवत होता.
एस.टी. की साईभाई गँग?
रफिक मुल्ला ऊर्फ देवा आणि शाहबाज यांची एस. टी. आणि साईभाई गँगसोबत उठबस होती. दोघेही दोन्ही टोळ्यांमध्ये असायचे. यामुळे या सुपारीमध्ये या दोन्ही टोळ्यांचा सहभाग तपासला जात आहे.
वडिलांचाच केला खून
कौंटुंबिक वादातून रफिकने स्वत:च्या वडिलांचाच २०१७ मध्ये खून केला होता. यामध्ये तो जामिनावर बाहेर आहे, तर २०२४ मध्ये शहबाजवर शेजाऱ्याच्या मोटारीची जाळपोळ केल्याचा गुन्हा राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल आहे.
१२ तासांत आरोपी जेरबंद
पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस अंमलदर वैभव पाटील, संतोष बरगे, गजानन गुरव, सत्यजित तानुगडे, सागर चौगले, अरविंद पाटील यांच्यासह पथकाने या घटनेचा रात्रभर तपास केला. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास दोघा संशयीतांना जेरबंद केले.
पिस्तुल कोल्हापूरातूनच घेतले
घटनेमध्ये वापरण्यात आलेले पिस्तूल कोल्हापुरातील एका आरोपीकडून घेतल्याची माहिती समोर आली आहे. याची पडताळणी करण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून, पिस्तूल पुरवणाऱ्यासही सहआरोपी करण्यात येणार आहे.
अनैतिक संबंधातूनच सुपारी
सूरज साखरेचा गेम करण्याची सुपारी अनैतिक संबंधातूनच दिली आहे. सुपारी देणारे कोण होते, कितीची सुपारी फुटली याचा उलगडाही लवकरच होणार आहे. पोलिसांच्या रडारवर असलेल्या काही जणांचे मोबाईल बंद असल्यामुळे तपासात अडथळे येत आहेत.
सीसीटीव्हीचा माग अन् संशयित जेरबंद
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी तपासकामी ७ पथके नेमून तपासाची चक्रे गतिमान केली होती. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हा गोळीबार देवा ऊर्फ रफिक मुल्ला यानेच केल्याची माहिती मिळाली. यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अंकली पुलाजवळून या दोघांना जेरबंद केले.