Milk Adulteration | दुधातील भेसळीला ग्राहकही तितकेच जबाबदार!

इथे प्रत्येकालाच हवे घट्ट-फेसाळणारे दूध : गुणवत्ता जाणून घेण्याबाबत कमालीची अनास्था
Milk Adulteration |
Milk Adulteration | दुधातील भेसळीला ग्राहकही तितकेच जबाबदार!Pudhari News Network
Published on
Updated on

सुनील कदम

कोल्हापूर : राज्यात दुधामधील भेसळीने जे काही थैमान मांडले आहे, त्याला ग्राहकही तितकेच जबाबदार आहेत. दुधाबाबत अवास्तव अपेक्षा आणि दुधाची गुणवत्ता जाणून घेण्याबाबत असलेली अनास्था, यामुळे ‘मागणी तसा पुरवठा’ या न्यायाने राज्यात भेसळीच्या दुधाचा ‘रतीब’ चालू आहे.

अनेकवेळा जनावरांच्या चाऱ्यावर दुधातील स्निग्धांश आणि एसएनएफचे प्रमाण अवलंबून असते. त्याचप्रमाणे चारा ओला की सुका, जनावरांना भरडा कोणता दिला जातो, यावरही दुधाची गुणवत्ता अवलंबून असते. महाराष्ट्रातील अनेक ब्रँडनी ही गुणवत्ता टीकवली आहे. मात्र, म्हैशीचे दूध काहीसे घट्ट तर गाईचे दूध काहीसे पातळ असते. पण अनेकदा ग्राहक या बाबी जाणून न घेता केवळ घट्ट आणि फेसाळयुक्त दुधाची अपेक्षा करतात. त्यांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी मग वापरला जातो तो स्टार्च आणि सोडा! आता मग या भेसळीच्याबाबतीत कुणाला दोष द्यायचा, याचा विचार करायला हवा!

गुणवत्तेबाबत अनास्था!

आज दुधाची गुणवत्ता जाणून घेण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. पण या मार्गांचा वापर करून दुधातील भेसळ ओळखण्याबाबत ग्राहकांमध्ये कमालीची अनास्था दिसून येते. शिवाय शासनाकडून दुधातील भेसळीबाबतचे कायदेही कठोर करण्यात आलेले आहेत. या कायद्याबाबतही ग्राहकांमध्ये अनभिज्ञता दिसून येते. दूध भेसळ विषयक कायद्याचा सबळ पुराव्यानिशी वापर केला तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीला चांगलाच आळा घालणे शक्य आहे. पण या बाबतीतही ग्राहकांकडून काही होताना दिसत नाही. परिणामी, ‘पदरी पडले ते पवित्र झाले’ या न्यायाने ग्राहकांना दूध भेसळीला तोंड द्यावे लागत आहे.

जागरूकता आवश्यक!

ग्राहकांनी दुधाच्या बाबतीतील भ्रामक अपेक्षा सोडल्यास, दुधाची गुणवत्ता तपासण्याची प्राथमिक माहिती घेतल्यास आणि दूध भेसळीबाबतच्या कायद्याची माहिती करून घेऊन थोडी जागरूकता दाखविल्यास दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ किमान काही प्रमाणात राेखणे सहजशक्य आहे. (समाप्त)

अशी ओळखा दुधातील भेसळ!

गुळगुळीत फरशी किंवा काचेच्या पृष्ठभागावर दुधाचा एक थेंब टाका. शुद्ध दूध हळूहळू खाली सरकते आणि पांढरा ठसा ठेवते. पाणी मिसळलेले दूध पटकन वाहते व ठसा कमी राहतो.

दूध थोडे थंड करून त्यात 2-3 थेंब आयोडीन द्रावण टाका. निळा रंग दिसल्यास स्टार्चची भेसळ निश्चित!

दूध बाटलीत घेऊन जोरात हलवा. साबणासारखा जास्त व टिकाऊ फेस तयार झाल्यास डिटर्जंटची भेसळ समजा.

कृत्रिम दूध हाताच्या बोटांमध्ये चोळल्यास साबणासारखा गुळगुळीतपणा जाणवू शकतो. कृत्रिम दूध गरम केल्यावर नैसर्गिक दुधासारखा वास येत नाही.

युरिया मिसळल्यास तीव्र रासायनिक वा अमोनियासारखा वास येऊ शकतो.

बहुतांश डेअरी व दूध संकलन केंद्रांत लॅक्टोमीटर, फॅट मीटर आणि एसएनएफ चाचणी करता येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news