कोल्हापूर : नूतनीकरणासाठी असलेली स्लॉट सिस्टीम त्वरित बंद करावी यांसह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी भर पावसात सोमवारी (दि. 28) जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चातून धडक दिली. बांधकाम कामगारांनी पिवळ्या टोप्या घातल्या होत्या. पावसात भिजतच सुरू असलेल्या मोर्चाने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार कृती समितीचे अध्यक्ष गुणवंत नागटिळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन दिले.
दसरा चौकातून दुपारी मोर्चा सुरू झाला. जोरदार पाऊस असूनही कामगार मोर्चातून चालत घोषणांनी परिसर दणाणून देत होते. राज्यातील तालुका सुविधा बंद करा, माध्यान्ह भोजन यंत्रणेची चौकशी करा, बांधकाम कामगारांच्या दोन मुलींना विवाह योजनेचा लाभ द्या आदींसह इतर घोषणांचे फलक कामगारांच्या हातात होते. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यावर कामगारांनी शंखध्वनी करूनराज्य शासनाचा निषेध केला. दरम्यान, शेकडो कामगार सहभागी झाल्याने शहरातील वाहतूक विस्कळीत झाली.
शिष्टमंडळात उपाध्यक्ष संजय गुदगे, संजय धुमाळ, एकनाथ गुरव, संदीप व्हराळे, युवराज पाटील, गणेश कांबळे, यल्लाप्पा मादार, विजय भोसले, अरविंद सुतार, पांडुरंग कांबळे, नारायण पाटील, रफीक जमादार यांच्यासह इतर सहभागी होते.
मंडळावर कामगार प्रतिनिधी व मालक प्रतिनिधी यांची नियुक्ती करावी, पाल्यास टॅबलेट व लॅपटॉप मिळावा, घरकूल योजनेच्या प्रलंबित अर्जांचा निपटारा करावा, व्यसनमुक्ती अभियान राबवावे, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसेवकांना आदेश द्यावेत. उपचारासाठी नोंदणी अॅक्टिव्हची अट रद्द करावी, 10 वर्षाआतील पाल्यांना उपचाराची तरतूद करावी, मृत कामगाराच्या योजनेसाठी स्वतंत्र पोर्टल तयार करावे, शहरी घरकूल योजनेसाठी जाचक अटी रद्द करा आदी मागण्या निवेदनात आहेत.