Kolhapur municipal corporation | मनपात काँग्रेसच मोठा पक्ष; भाजप दुसर्‍या स्थानी

शिवसेनेची चांगली कामगिरी; जनसुराज्य शक्तीसह शिवसेना उबाठाला प्रत्येकी एक जागा
Kolhapur municipal corporation
कोल्हापूर : विजयी उमेदवारांच्या समथंकांनी चौकाचौकांत जल्लोष केला.
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस सर्वाधिक 34 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपने गतवर्षीच्या कामगिरीत दमदार सुधारणा करत 26 जागा मिळवत दुसर्‍या स्थानी झेप घेतली. शिवसेनेनेही 15 जागा जिंकत शानदार कामगिरी केली. राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र, चारच जागांवर समाधान मानावे लागले. जनसुराज्य शक्ती व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही प्रत्येकी एक जागा मिळाली.

प्रभाग 1 मध्ये काँग्रेसच भारी

कसबा बावड्याचा अंतर्भाव असलेल्या प्रभाग एक काँग्रेसच भारी ठरली. अत्यंत महत्त्वाच्या व संवेदनशील या मतदारसंघात काँग्रेसचे चारही उमेदवार प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव करून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. काँग्रेसच्या पुष्पा नीलेश नरोटे यांना सर्वाधिक 10 हजार 713 मते पडली. त्या 3286 मतांनी विजयी झाल्या. सुभाष बुचडे यांनी शिवसेनेच्या अमर साठे यांचा पराभव केला. भाग ब मधून शिवसेनेच्या गीता जाधव यांचे आव्हान काँग्रेसच्या पुष्पा नरूटे यांनी मोडीत काढले. भाग क मध्ये काँग्रेसच्या रूपाली पोवार यांनी शिवसेनेच्या प्रियांका उलपे यांचा पराभव केला. भाग ड मध्ये काँग्रेसच्या सचिन चौगले यांनी शिवसेनेच्या कृष्णा लोंढे यांना पराभूत केले.

प्रभाग 2 मध्ये शिवसेनेचा करिष्मा

प्रभाग दोनमध्ये सर्व चारही जागावर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व मिळवले. भोसलेवाडी, कदमवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प परिसर, मुक्त सैनिक वसाहतचा काही भाग असलेल्या प्रभागात शिवसेनेचे सर्व उमेदवार 3369 ते 538 मताधिक्याने विजयी झाले. पहिल्या फेरीपासूनची आघाडी वाढून दुसर्‍या फेरीत मोठे मताधिक्य राखत शिवसेनेचे चारही उमेदवार विजयी झाले. या प्रभागातील भाग-अ मधून शिवसेनेच्या वैभव माने यांनी काँग्रेसच्या दीपक कांबळे यांचा पराभव केला. भाग ब मधून शिवसेनेच्या अर्चना पागर यांनी काँग्रेसच्या आरती शेळके यांना पराभूत केले. भाग क मध्ये शिवसेनेच्या प्राजक्ता जाधव यांनी काँग्रेसच्या सीमा भोसले यांना पराभूत केले. भाग ड मध्ये शिवसेनेच्या स्वरूप कदम यांनी काँग्रेसच्या नागेश पाटील यांचा पराभव केला.

प्रभाग 3 मध्ये सबकुछ भाजप

प्रभाग क्रमांक 3 मध्ये सबकुछ भाजप राहिले. आजी-माजी खासदारांची निवासस्थाने असल्याने या प्रभागातील निकालाकडे नजरा लागल्या होत्या. येथे भाजपच्या चारही उमेदवारांनी विजयाचा झेंडा फडकवत घवघवीत यश मिळवले. काँग्रेसच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला. भाग अ मध्ये काँग्रेसचे प्रकाश पाटील यांचा भाजपचे प्रमोद देसाई यांनी पराभव केला. भाग ब मध्ये भाजपच्या वंदना मोहिते आणि काँग्रेसच्या रूपा पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली. मोहिते यांनी पाटील यांना पराभवाचा धक्का दिला. भाग क मध्ये भाजपच्या राजनंदा महाडिक आणि काँग्रेसच्या किरण तहसीलदार यांच्यात लढत झाली. अत्यंत चुरशीने झालेल्या लढतीत महाडिक यांनी तहसीलदार यांचा दारुण पराभव केला. भाग ड मध्ये भाजपचे विजेंद्र माने यांनी काँग्रेसचे महेंद्र चव्हाण यांना पराभूत करत विजयाचा झेंडा फडकावला.

प्रभाग 4 मध्ये काँग्रेसचाच दबदबा

प्रभाग 4 मध्ये काँग्रेसचाच दबदबा राहिला. शहरातील प्रमुख झोपडपट्टीचा भाग असलेल्या या प्रभागात काँग्रेस विरुध्द महायुतीमधील शिवसेना-भाजप उमेदवारांत थेट लढत झाली. काटाजोड आणि अत्यंत चुरशीने झालेल्या लढतीत काँग्रेसने विरोधकांचा धुव्वा उडवत शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांना चारीमुंड्या चित केले. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले राजेश लाटकर यांच्या नेतृत्वाखाली या प्रभागात त्यांच्यासह काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी झाले. सदर बाजार, विचारे माळ येथे काँग्रेसचे लाटकर व शिवसेनेचे मारुती माने यांच्यात राजकीय वैर आहे. लाटकर यांनी येथे बाजी मारली. सदर बाजार, विचारे माळ, कनाननगरसह सासने ग्राऊंड परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसराचा समावेश प्रभागात आहे.

भाग अ मध्ये काँग्रेस, शिवसेना, बसप आणि अपक्ष असे चार उमेदवार रिंगणात होते. मात्र काँग्रेसच्या स्वाती कांबळे आणि शिवसेनेच्या शुभांगी भोसले यांच्यात थेट लढत झाली. त्यात कांबळे यांनी बाजी मारली.भाग- ब मध्ये काँग्रेसच्या विशाल चव्हाण यांनी भाजपचे माजी नगरसेवक दिलीप पोवार यांचा पराभव करून विजय साकारला. भाग-क मध्ये शिवसेनेच्या स्मिता मारुती माने आणि काँग्रेसच्या दीपाली घाटगे यांच्यात चुरशीने लढत झाली. अटीतटीच्या संघर्षात घाटगे यांनी माने यांचा पराभव केला. भाग- ड मध्ये काँग्रेसच्या राजेश लाटकर यांनी भाजपचे माजी नगरसेवक संजय निकम यांना धूळ चारली. हाय व्होल्टेज वाटणारी ही लढत एकदमच एकतर्फी झाली. लाटकर यांनी निकम यांचा पराभव करून सदर बाजार, विचारे माळ आपला बालेकिल्ला असल्याचे दाखवून दिले.

प्रभाग 5 मध्ये काँग्रेसचा तीन जागांवर विजय

पाचव्या प्रभागाची मोजणी शासकीय धान्य गोडावून रमणमळा येथे दुपारी सुरुवात झाली, पहिल्या फेरी अखेर या प्रभागात काँग्रेसचे चारही उमेदवार आघाडीवर होते, दुसर्‍या फेरीअंती काँग्रेसचे तीन उमेदवार विजयी झाले तर भाजपच्या एक उमेदवार अवघ्या 16 मतांनी विजयी झाल्या. या प्रभागाची फेर मतमोजणी करण्यात आली.

या प्रभागात भाग-अ मधून काँग्रेसच्या विनायक कारंडे यांनी शिवसेनेच्या अनिल अधिक यांचा पराभव केला. भाग- ब मध्ये भाजपच्या मनाली पाटील यांच्यावर मात करत माजी महापौर, काँग्रेसच्या स्वाती यवलुजे यांनी विजय नोंदवला. भाग-क मध्ये काँग्रेसच्या सरोज सरनाईक यांना पराभवाचा धक्का बसला. त्यांचा अवघ्या 16 मतांनी भाजपच्या पल्लवी देसाई यांच्याकडून पराभव झाला. भाग-ड मध्ये काँग्रेसचे माजी उपमहापौर अर्जुन माने यांनी शिवसेनेचे समीर यवलुजे यांचा पराभव केला. इतर तीन उमेदवारांप्रमाणे आपलाही पराभव झाला म्हणून भाजपच्या उमेदवार पल्लवी देसाई या मतमोजणी केंद्रातून बाहेर गेल्या होत्या, अंतिम आकडे पुढे येण्याअगोदर सरोज सरनाईक यांना आपल्याला कमी मते पडल्याचा अंदाज आला. त्यांनी तत्काळ निवडणूक अधिकारी यांच्याकडे धाव घेतली. निवडणूक अधिकारी डॉ. संदीप भंडारे यांनी मतदानाची आकडेवारी व पोस्टल मतांची आकडेवारी त्यांच्या समोर ठेवली. एवढ्यावर समाधान न झाल्याने सरनाईक यांनी फेरमतमोजणीची अर्जाद्वारे मागणी केली. प्रभागाची दुसर्‍यांदा मतमोजणी केली. यावेळी भाजपच्या उमेदवारांना परत बोलवले. फेरमतमोजणीतही आकडेवारी कायम राहिली.

प्रभाग 6 : महायुतीला 3 तर महाविकास आघाडीला 1 जागा

प्रभाग 6 मध्ये महायुतीला 3 तर महाविकास आघाडीला 1 जागा मिळाली. या प्रभागात भाजपच्या दीपा काटकर व काँग्रेसच्या तनिष्का सावंत यांच्यातील लढत चुरशीची झाली. पहिल्या दोन फेरीत सावंत सुमारे दीड हजार पेक्षा अधिक मतांनी आघाडीवर होत्या. शेवटची फेरी राहिली होती. सावंत यांच्या कार्यकर्त्यांची तयारी सुरू होती, तोपर्यंत चौथ्या फेरीचा निकाल जाहीर झाला आणि वातावरण बदलले. दीपा काटकर यांनी तिसर्‍या फेरीत सतराशे मताची आघाडी पार करून 419 मतांनी विजयी झाल्या. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीवमध्ये काँग्रेसच्या तेजस्विनी घोरपडे यांनी पहिल्या फेरीतच एक हजारची आघाडी घेतली; परंतु ही आघाडी कायम राखता आली नाही. माधवी गवंडी यांनी दुसर्‍या फेरीतच जादा मते घेऊन ही एक हजारची आघाडी कमी केली. तिसर्‍या फेरीतही आघाडी घेत गवंडी यांनी विजयावर शिक्कामोर्तब केला. त्या 2 हजार 149 मताधिक्यांनी विजयी झाल्या. गवंडी यांना 8652 मते मिळाली तर घोरपडे यांना 6503 मते मिळाले. शिवसेनेच्या शीला सोनुले व काँग्रेसचे रजनिकांत सरनाईक यांच्यातील लढत एकतर्फी झाली. सोनुले यांना 10 हजार 209 मते तर सरनाईक यांना 5 हजार 719 मते मिळाले. सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील माजी नगरसेवक प्रताप जाधव व माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांच्यातील लढतीमध्ये जाधव पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. अखेर त्यांनी 1 हजार 704 मताधिक्यांने विजय मिळवला.

ऋतुराज क्षीरसागर यांचा प्रभाग 7 मध्ये विजय

प्रभाग 7 मध्ये शिवसेना, भाजपचेच वर्चस्व राहिले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांचे सुपुत्र ऋतुराज क्षीरसागर विजयी झाले. त्यांच्या विरोधात माजी नगरसेवक विजय सरदार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उभे ठाकले होते. क्षीरसागर यांच्या द़ृष्टीने प्रारंभी सोपी वाटणारी निवडणूक हळूहळू सरदार यांची हवा होऊ लागल्याने कठीण होत गेली. मात्र क्षीरसागर यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेत विजय मिळवला. शिवसेनेच्या दुसर्‍या उमेदवार मंगल साळोखे यांनी एकतर्फी विजय मिळवला. पहिल्या फेरीपासून साळोखे यांची मोठी आघाडी घेत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या सुप्रिया साळोखे व जनसुराज्य शक्ती पक्षाचे माजी महापौर उदय साळोखे यांच्या पत्नी माजी नगरसेविका पुजाश्री साळोखे यांचा पराभव केला. याच प्रभागातून भाजपचे माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्या पत्नी दीपा ठाणेकर यांनी काँग्रेसच्या माजी नगरसेविका उमा बनछोडे यांचा पराभव केला तर भाजपच्याच विशाल शिराळे यांनी काँग्रेसच्या नितीन ब—ह्मपुरे यांचा मोठ्या मताधिक्यांनी पराभव केला.

चुरशीच्या लढतीत बोंद्रेंची बाजी

प्रभाग 8 मध्ये काँग्रेसचे इंद्रजित बोंद्रे व शिवसेनेचे शिवतेज खराडे या मामे-आत्येभावात लढत झाली. त्यात बोंद्रे यांनी बाजी मारली. ते पहिल्या फेरीपासून आघाडीवर राहिले. त्यांना 7 हजार 950 मते मिळाली. पराभूत खराडे यांना 6 हजार 555 इतकी मते मिळाली. जनसुराज्यच्या अनिल पाटील यांनीही 2 हजार 773 मते घेतली. या प्रभागात काँग्रेसच्या प्रशांत खेडकर यांनी बाजी मारली. या गटात हेमंत कांदेकर, रमेश खाडे असे उमेदवार होते. खेडकर यांना 6 हजार 23, कांदेकर यांना 5 हजार 660 व खाडे यांना 5 हजार 506 मते मिळाली. 363 मताधिक्यांनी विजयी झाले. शिवसेनेच्या माजी नगरसेविका अनुराधा खेडकर यांनी जागा राखण्यात यश मिळविले. पहिल्या फेरीपासून आघाडी घेत त्या विजयी झाल्या. काँग्रेसच्या अक्षता पाटील आणि जनसुराज्यच्या स्वाती लिमकर यांचा त्यांनी पराभव केला. काँग्रेसच्या ऋवेदा मानेही विजयी झाल्या. त्यांनी 8 715 मते घेत प्रतिस्पर्धी भाजपच्या शिवानी पाटील, जनसुराज्यच्या ऋतुजा म्हसवेकर यांचा पराभव केला.

हाय व्होल्टेज लढतीत शारंगधर देशमुख विजयी

प्रभाग नऊमध्ये महाविकास आघाडीला जोरदार झटका देत महायुतीच्या सर्व चार उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. माजी नगरसेवक राहुल माने आणि शारंगधर देशमुख यांच्यातील लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. त्यात देशमुख यांनी 3103 मताधिक्यांनी माने यांचा पराभव केला. शिवसेनेच्या उमेदवार, माजी नगरसेविका संगीता सावंत यांनी काँग्रेसच्या विद्या देसाई यांना पराभूत केले. तर भाजपच्या माधवी पाटील यांनी तब्बल 7671 मतांचे लीड घेऊन काँग्रेसच्या पल्लवी बोलाईकर यांचा पराभव केला. भाजपचे विजय ऊर्फ रिंकू देसाई यांनी काँग्रेसच्या नंदकुमार पिसे यांच्यावर 7426 मताधिक्य घेऊन विजय साजरा केला.

जनसुराज्यचे अक्षय जरग विजयी

शिवाजी पेठ परिसराचा समावेश असलेल्या 10 नंबर प्रभागात भाजपच्या माजी नगरसेविका अर्चना कोराणे, पूर्वा राणे, शिवसेनेचे अजय इंगवले यांनी विजय मिळवले. याच प्रभागातून जनसुराज्यच्या अक्षय जरग यांनी प्रतिस्पर्धी शिवसेना उबाठाचे राहुल इंगवले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश सावंत यांचा पराभव केला. इंगवले यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेत काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ताजी टिपुगडे यांचा पराभव केला. भाजपच्या अर्चना कोराणे यांनी काँग्रेसच्या प्रणोती पाटील यांचा 6748 मतांनी पराभव केला. पहिल्या फेरीपासूनच कोराणे यांनी जवळपास अडीच हजार मतांची आघाडी घेतली होती. भाजपच्या पूर्वा राणे यांनी माजी नगरसेविका काँग्रेसच्या दीपा मगदूम यांचा केवळ 145 मतांनी पराभव केला. भाग-ड मधून जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय जरग विजयी झाले. या गटातून शिवसेना ठाकरे गटाचे राहुल इंगवले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक महेश सावंत पराभूत झाले.

प्रभाग 11 मध्ये महायुतीला तीन, काँग्रेसला एक जागा

प्रभाग 11 मध्ये महायुतीने तीन जागा जिकंत गड राखला. या प्रभागातून भाजपच्या नीलांबरी साळोखे, माजी नगरसेविका माधुरी नकाते, शिवसेनेचे सत्यजित जाधव विजयी झाले. काँग्रेसच्या माजी नगरसेविका जयश्री चव्हाण यांनीही विजयाचा गुलाल उधळला. गट अ मधून भाजपच्या साळोखे आणि काँग्रेसच्या यशोदा आवळे यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला. साळोखे यांनी 7026 मतांसह आवळे यांचा 2060 मतांनी पराभव केला. भाग ब मधून काँग्रेसच्या जयश्री चव्हाण यांनी बाजी मारली. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या यशोदा मोहिते आणि जनसुराज्य शक्तीच्या शारदा देवणे यांचे कडवे आव्हान होते. गट क मधून शिवसेनेचे सत्यजित जाधव यांनी काँग्रेसच्या संदीप सरनाईक यांना पराभूत केले. माजी आमदार जयश्री जाधव यांचे सुपुत्र असलेल्या जाधव यांनी सरनाईक यांचा 1856 मतांनी पराभव केला. गट ड मधून भाजपच्या नकाते यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सचिन मांगले यांचा 685 मतांनी पराभव केला. पहिल्या फेरीपासूनच नकाते आणि मांगले यांच्यात मतांमध्ये रस्सीखेच सुरू होती.

प्रभाग क्र.12 मध्ये महायुती-महाविकासला समान संधी

प्रभाग 12 मध्ये काँग्रेस-महायुती प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. या प्रभागाच्या गट अ मधून शिवसेनेचे अश्किन आजरेकर यांनी काँग्रेसच्या रियाज सुभेदार यांचा पराभव केला तर गट ब मधून काँग्रेसच्या स्वालिया बागवान यांनी शिवसेनेच्या संगीता पोवार यांना पराभूत केले. गट क मधून काँग्रेसच्या अनुराधा मुळीक यांनी विजयाचा झेंडा फडकावत महायुतीच्या अमृता पोवार यांचा पराभव केला. गट ड मधील प्रतिष्ठेच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवक आदिल फरास यांनी काँग्रेसचे माजी नगरसेवक ईश्वर परमार यांचा पराभव केला.

प्रभाग 13 ः महायुतीला तीन जागा

प्रभाग 13 मध्ये महायुतीने तीन जागांवर विजय मिळवला. गट अ मधून भाजपच्या माधुरी व्हटकर यांनी काँग्रेसच्या डॉ. पूजा शेटे यांचा पराभव केला. गट ब मधून भाजपच्या रेखा उगवे यांनी काँग्रेसच्या अलिया गोलंदाज यांना पराभूत केले. गट क मध्ये काँग्रेसच्या प्रवीण सोनवणे यांनी शिवसेनेच्या ओंकार जाधव यांचा पराभव केला. गट ड मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नियाज खान यांनी काँग्रेसचे दीपक थोरात यांचा पराभव केला. या मतदार संघात जनसुराज्यच्या शेखर जाधव यांनीही लक्षवेधी मते घेतली.

प्रभाग 14 मध्ये काँग्रेसला तीन, महायुतीला एक जागा

प्रभाग 14 मध्ये काँग्रेसने तीन जागांवर विजय मिळवला.या प्रभागात गट अ मधून काँग्रेसच्या दिलशाद मुल्ला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेमा डवरी यांचा पराभव केला. गट ब मधून भाजपच्या निलिमा पाटील यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या छाया पाटील व जनसुराज्यच्या पूजा शिराळकर यांचा पराभव केले. गट क मधून शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रकाश नाईकवरे पराभूत झाले. तिथे काँग्रेसचे अमर समर्थ यांनी 92 मतांनी विजय मिळवला. गट ड मधून काँग्रेसचे माजी नगरसेवक विनय फाळके यांनी विजय मिळवला. शिवसेनेचे माजी नगरसेवक अजित मोरे यांचा त्यांनी पराभव केला.

प्रभाग क्रमांक 15 मध्ये काँग्रेस, भाजपसह ठाकरे सेनेचा विजय

प्रभाग 15 मध्ये काँग्रेसने दोन जागा पटकावल्या तर शिवसेना ठाकरे सेनेने एका जागेवर विजय मिळविला. भाजपने एक जागा जिंकली. गट अ मधून माजी महापौर कांचन कवाळे, माजी नगरसेवक शिवाजी कवाळे यांचे सुपुत्र, माजी महापौर कादंबरी कवाळे यांचे दीर काँग्रेसचे रोहित कवाळे यांनी पहिल्यापासून आघाडी घेऊन विजय साकारला. गट ब मधून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांनी भाजपच्या जास्मिन जमादार यांचा पराभव केला. उत्तुरे महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख आहेत. कोल्हापूर शहरात उत्तुरे यांच्या रूपाने ठाकरे सेनेला एकमेव विजय साकारता आला. गट क मधून भाजपच्या सृष्टी जाधव यांनी काँग्रेसच्या अश्विनी कदम यांना पराभूत केले. कदम यांनी फेरमतमोजणीची मागणी केली; परंतु निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी त्यांचा अर्ज निकाली काढला. जाधव या माजी महापौर दीपक जाधव यांच्या स्नुषा आहेत. गट ड मध्ये शिवसेनेचे दुर्गेश लिंग्रस यांना पराभूत करत काँग्रेसचे, माजी उपमहापौर संजय मोहिते यांनी विजयाचा झेंडा फडकावला. लिंग्रस यांनी निकराचा लढा दिला. मात्र, त्यांना यश आले नाही.

प्रभाग 16 मध्ये फिफ्टी फिफ्टी

प्रभाग 16 मध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीला प्रत्येकी दोन जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसचे उमेश पोवार, धनश्री कोरवी यांनी तर भाजपच्या मुरलीधर जाधव आणि पूजा पोवार यांनी बाजी मारली. पोवार यांनी माजी उपमहापौर विलास वास्कर यांना पराभूत केले. गट ब मध्ये काँग्रेसच्या धनश्री कोरवी यांनी भाजपच्या अपर्णा पोवार यांच्यावर विजय मिळवला. गट क मध्ये भाजपच्या पूजा पोवार यांनी काँग्रेसच्या पद्मावती पाटील यांचा पराभव केला. पहिल्या फेरीत पोवार यांनी आघाडी घेतली होती. या प्रभागातील लक्षवेधी ठरलेल्या गट ड मध्ये भाजपचे उमेदवार माजी नगरसेवक मुरलीधर जाधव यांनी काँग्रेसचे उत्तम शेटके यांचा पराभव केला. पहिल्या फेरीतच जाधव यांनी आघाडी घेऊन विजय निश्चित केला.

प्रभाग 17 मध्ये काँग्रेसची बाजी

प्रभाग 17 मध्ये काँग्रेसने चारही जागा जिंकून एकहाती विजय मिळवत बाजी मारली. या प्रभागात भाग अ मध्ये काँग्रेसच्या अर्चना बिरांजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रियंका कांबळे यांचा पराभव केला. पहिल्या फेरीत बिरांजे यांनी घेतलेली आघाडी निर्णायक ठरली. भाग ब मध्ये काँग्रेसच्या सचिन शेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र मुतगी यांचा पराभव केला. भाग क मधून काँग्रेसच्या शुभांगी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जहिदा मुजावर यांच्यावर विजय मिळविला. याच प्रगातील भाग ड मधून माजी नगरसेवक काँग्रेसचे प्रवीण केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र पाटील यांच्यावर दणदणीत विजय मिळविला. केसरकर यांनी पहिल्या फेरीपासून मताधिक्य घेऊन विजयी घोडदौड सुरू केली होती.

प्रभाग 18 मध्ये महायुतीची सरशी : काँग्रेसला एक जागा

प्रभाग 18 मध्ये चारपैकी तीन जागा मिळवून महायुतीची सरशी झाली, तर काँग्रेसला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. या प्रभागात भाजपच्या रूपाराणी निकम यांनी विजयश्री खेचून आणली तर काँग्रेसचे माजी नगरसेवक भूपाल शेटे यांना पराभव स्वीकारावा लागला. गट अ मध्ये काँग्रेसच्या अरुणा गवळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवानी गुर्जर यांचा पराभव केला. गट ब मध्ये शिवसेनेच्या कौसर बागवान यांनी काँग्रेसच्या गीतांजली हवालदार यांचा पराभव केला. गट क मध्ये भाजपच्या माजी नगरसेविका रूपाराणी निकम यांनी काँग्रेसचे माजी नगरसेवक भूपाल शेटे यांचा पराभव केला. गट ड मध्ये भाजपच्या बबन ऊर्फ अभिजित मोकाशी यांनी काँग्रेसचे सर्जेराव साळोखे यांचा पराभव केला.

प्रभाग 19 मध्ये फिफ्टी-फिफ्टी

प्रभाग 19 मध्ये अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या लढतीत काँग्रेस व महायुतीचा प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. काँग्रेसकडून दुर्वास कदम आणि डॉ. सुषमा जरग यांनी विजय मिळवला, तर महायुतीकडून विजयसिंह खाडे-पाटील व राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या मानसी लोळगे यांनी बाजी मारली. या निवडणुकीत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे व काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मधुकर रामाणे यांचा धक्कादायक पराभव झाला. उमेदवारी नाकारल्याने मूळचे भाजपचे माजी नगरसेवक सुभाष रामुगडे यांनी सुरुवातीला अपक्ष व नंतर जनसुराज्यकडून उमेदवारी मिळवली. पण, त्यांनाही यश आले नाही. गट अ मधून दुर्वास कदम यांनी अवघ्या 41 मतांनी राहुल चिकोडे यांच्यावर विजय मिळवला. गट ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मानसी लोळगेंनी काँग्रेसच्या शुभांगी पोवार यांना पराभूत केले. गट क मध्ये काँग्रेसच्या डॉ. सुषमा जरग यांनी भाजपच्या रेणू माने यांना पराभूत केले. तर गट ड मधून काँग्रेसचे मधुकर रामाणे यांना भाजपचे माजी नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील यांनी पराभूत केले.

प्रभाग 20 मध्ये चार महायुतीकडे; एक काँग्रेसला

पाच नगरसेवक असणारा हा सर्वात मोठा प्रभाग असणार्‍या प्रभाग क्रमांक 20 मध्ये चार जागा जिंकून महायुतीने आपले वर्चस्व निर्माण केले. एक जागा काँग्रेसला मिळाली. भाग अ मधून काँग्रेसच्या जयश्री कांबळे यांनी भाजपच्या सुषमा जाधव यांचा पराभव केला. भाग ब मध्ये भाजपच्या सुरेखा ओटवकर यांनी काँग्रेसच्या उत्कर्षा शिंदे यांना पराभूत केले. या प्रभागात आम आदमी पार्टीकडून निवडणूक लढवत असलेल्या तृतीयपंथी उमेदवार, शिवानी गजबर यांना 730 मते मिळवता आली. भाग क मध्ये काँग्रेसच्या धीरज पाटील यांना भाजपाचे वैभव कुंभार यांनी पराभूत केले. भाग ड मध्ये माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांच्या पत्नी, काँग्रेसच्या मयुरी बोंद्रे यांना भाजपच्या नवख्या नेहा तेंडुलकर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. तेंडुलकर यांनी प्रारंभी पासून आघाडी घेत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भाग-ई मध्ये शिवसेनेच्या अभिजित खतकर यांनी माजी नगरसेवक, काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजू दिंडोर्ले यांना पराभूत केले.

एकमेकांचे नातेवाईक सभागृहात

प्रभाग सातमधून ऋतुराज क्षीरसागर व त्यांच्या आत्या मंगल साळोखे दोघेही विजयी झाले आहेत. ऋतुराज यांच्या मामी वंदना मोहिते प्रभाग क्रमांक तीन मधून विजयी झाल्या. प्रभाग आठमधून विजयी झालेले प्रशांत खेडकर व अनुराधा खेडकर हे दीर-भावजय सभागृहात गेले आहे. प्रभाग क्रमांक 16 मधून मुरलीधर जाधव आणि त्यांची स्नुषा सृष्टी जाधव प्रभाग क्रमांक 15 मधून विजयी झाले आहेत.

शिडीवाहकाची पत्नी बनली नगरसेविका

महापालिकेत विद्युत विभागात शिडीवाहक म्हणून 32 वर्षे सेवेनंतर निवृत्त झालेले महादेव साळोखे यांच्या पत्नी मंगल साळोखे विजयी झाल्या. सामाजिक कार्यात सतत पाठीशी त्या राहिल्या. त्यांनी आजपर्यंत केलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे साळोखे यांनी सांगितले.

दोन ठिकाणी फेर मतमोजणी

प्रभाग क्रमांक- 5 मधील भाग- क मध्ये आणि प्रभाग क्रमांक-19 मधील भाग-अ मधील प्रतिस्पर्धी उमेदवारांना अनुक्रमे 16 आणि 41 मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले. मताधिक्य कमी असल्याने त्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. त्यानंतर झालेल्या फेर मतमोजणीतही निकाल कायम राहिला.

कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

पाचव्या प्रभागात पराभूत उमेदवार सरोज सरनाईक यांच्या समर्थकांना अश्रू अनावर झाले. त्यांना अवघ्या 16 मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले. गत निवडणुकीत त्यांचे पती संदीप सरनाईक यांना 63 मतांनी पराभव पत्करावा लागला होता. सलग दुसर्‍यांदा विजयाने हुलकावणी दिल्याने त्यांच्या समर्थकांना अश्रू अनावर झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news