

कोल्हापूर : दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे शनिवारी सायंकाळी राजारामपुरीत कँडल मोर्चा काढण्यात आला. या कँडल मार्चद्वारे नागरिकांनी तरुणाईचा एल्गार अनुभवला. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘इन्कलाब जिंदाबाद’ ‘यूथ पॉवर नेशन्स पॉवर’ आदीसह विविध घोषणांनी मोर्चाचा मार्ग दणाणून सोडला.
सायंकाळी पाच वाजल्यापासूनच जनता बाजार चौकात विद्यार्थी, तरुण-तरुणी, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. हातात मशाल आणि मेणबत्त्या घेऊन कँडल मार्चला सुरुवात झाली. काळा टी शर्ट, डोक्याला, दंडाला काळी पट्टी बांधून युवक, नागरिक सहभागी झाले होते. महिलांनी काळ्या साड्या परिधान करून मोर्चात सहभाग घेतला. जनता बाजार चौक, माऊली चौक मार्गे मोर्चा सायबर चौक येथे आला. सायबर चौकात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. मोर्चा मार्गावरील उपस्थितांनीही मोर्चात सहभाग नोंदवत सरकारविरोधात रोष व्यक्त केला.