kolhapur | प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत गोंधळ

विषयपत्रिका वाचन सुरू असताना विरोधक आक्रमक; धावून जाण्याचे प्रकार
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत एकमेकांच्या अंगावर धावून जात गोंधळ घालताना विरोधी व सत्ताधारी गटाचे सभासद.
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत एकमेकांच्या अंगावर धावून जात गोंधळ घालताना विरोधी व सत्ताधारी गटाचे सभासद. (छाया : पप्पू अत्तार)
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत विषयपत्रिका वाचन, नफा-तोटा पत्रक, ‘डीपीसीएस’ (एनपीएसधारक) सभासद मयत कल्याण निधी या मुद्द्यांवर गोंधळ झाला. अंगावर धावून जाणे, माईक हिसकावून घेणे, अर्वाच्च भाषेचा वापर करीत ‘गुरुजीं’नी गोंधळाची परंपरा कायम ठेवली; मात्र विरोधकांसह सभासदांच्या प्रश्नांना सयंमाने उत्तरे देत चेअरमन बाबूराव परीट यांनी सभा शेवटपर्यंत चालवली.

शिक्षक बँकेची वार्षिक सभा आयर्विन मल्टीपर्पज हॉल येथे रविवारी झाली. चेअरमन बाबूराव परीट यांनी प्रास्ताविकात बँकेच्या कामाचा आढावा घेतला. बँकेचे सीईओ संजयकुमार मगदूम यांनी विषयपत्रिकेमधील वार्षिक अहवाल, ताळेबंद नफा-तोटा पत्रक वाचून स्वीकृत करण्याचा विषय सभेपुढे मांडला. विरोधी गटातील सभासदांनी व्यासपीठाजवळ जाऊन चेअरमन यांना विचारणा केली. यावेळी गोंधळास सुरुवात झाली. हातवारे करीत काहीजणांनी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार केले. शेवटी चेअरमन परीट यांनी सीईओ मगदूम यांना मध्येच थांबवून माईक हातात घेतला. सभासदांना शांत बसण्याचे आवाहन केले, तरीही गोंधळ सुरूच राहिला.

मनोजकुमार रणदिवे, सर्जेराव राऊत, श्वेता खांडेकर यांनी नियमित सभासदांपेक्षा ‘डीसीपीएस’धारकांवर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचला. निवडणुकीवेळी २५ लाख रुपये देण्याचे दिलेले आश्वासन सत्ताधाऱ्यांनी पाळले नसल्याचा आरोप केला. ६५ हजार रुपये घ्या, सभासदांना १३ लाख रुपये देण्याची मागणी लावून धरली. यावरून सभेत पुन्हा गोंधळ उडाला. सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आले. यावेळी चेअरमन परीट यांनी हस्तक्षेप करीत ‘डीसीपीएस’धारकांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन दिले.

संभाजी बापट, प्रशांत पोतदार यांनी ‘एनपीए’ थकबाकी, डाटा सेंटर भाडे, वकील फी याबाबची उत्तर देण्याची मागणी केली. त्यावर आरबीआयच्या पत्रकानुसार ६० लाख रुपये वर्ग केले ही चूक आहे का? असा प्रतिप्रश्न चेअरमन परीट यांनी केला. यावर विरोधी गटातील सभासद आक्रमक होत उठून उभे राहिल्याने गोंधळ झाला. यानंतर प्रसाद पाटील यांनी ‘बीडीडीआर’मधील ६० लाख रुपये रक्कम काढून उत्पन्‍न खात्यास जमा घेतल्याचे सांगितले. यावेळी बोलत असताना अचानक त्यांचा माईक बंद केल्याने त्यांना राग अनावर झाला. पुन्हा माईक बंद केल्यास बघून घेतो, असा दम त्यांनी संबंधितास भरला. पोटनियम दुरुस्तीमध्ये संचालक संख्या चारने वाढविल्यास एका तालुक्यात संचालक संख्या वाढेल, असे त्यांनी सांगितले.

कळे व राधानगरी, मलकापूर शाखेची स्व-मालकीची इमारत कधी होणार, क्रियाशील सभासद, आजरा, गडहिंग्लज, वारणा-कोडोली शाखेचे उत्पन्‍न वाढ, उत्कर्ष योजनेबाबत सभासदांनी प्रश्न उपस्थित केले. प्रश्नोतरांचा तास संपल्यानंतर वंदेमातरमने सभेची सांगता झाली.

चार संचालक वाढविण्यास मंजुरी

शिक्षक बँकेच्या सभेत अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक, शासकीय लेखा परीक्षण अहवाल, खर्च, अंदाजपत्रक मंजुरी यासह पोटनियम दुरुस्तीत संचालक संख्या ४ वाढविण्यास सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. त्यामुळे बँकेची संचालक संख्या १७ वरून २१ होणार आहे.

५ लाख रुपये कर्ज व २ लाख रुपये ठेवीची अट ठेवा

शिक्षक बँकेत ५ लाख रुपये कर्ज व २ लाख रुपये ठेवी असणाऱ्या सभासदास निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहण्याचा ठराव सर्वांनुमते मंजूर करा, अशी मागणी सभासद मुरलीधर पाटील यांनी केली. यास सभासदांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

...अन्यथा उपोषण करणार शिक्षक बँकेच्या अहवालात

१८ पाने इंग्रजीत असल्याचे एका सभासदाने सांगितले. पुढील वर्षी अहवालात यातील दहा पाने इंग्रजी ठेवावी; अन्यथा उपोषण करण्याचा इशारा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news