पुणे : राज्यात कर्करोगाच्या रुग्णांना आवश्यक सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा उपलब्ध होणार आहेत. यासाठी ‘एल 1’, ‘एल 2’ आणि ‘एल 3’ अशी वर्गवारी करण्यात आली आहे. ‘एल 1’मध्ये टाटा मेमोरियल हॉस्पिटल ही शिखर संस्था म्हणून काम करणार आहे. ‘एल 2’ या स्तरावर कायमस्वरूपी संपूर्ण कर्करोग शिक्षण व सेवा उपलब्ध असेल.
या वर्गवारीमध्ये ससून सर्वोपचार रुग्णालयासह छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, नागपूर, मुंबई (जे.जे.), कोल्हापूर, नांदेड येथील 7 शासकीय महाविद्यालयांशी संलग्नित रुग्णालये यांचा समावेश आहे. याशिवाय, नाशिक व अमरावती येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील दोन संदर्भ सेवा रुग्णालयांचा यामध्ये समावेश असून, ‘एल 2’ वर्गवारीमध्ये 9 केंद्रे समाविष्ट आहेत.
कर्करोगाचे वाढते प्रमाण व कर्करोग उपचाराचे गांभीर्य विचारात घेता, राज्यातील जनतेला सर्वसमावेशक कर्करोग सेवा राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार, आसाम कॅन्सर केअर मॉडेलच्या धर्तीवर राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा उपलब्ध होणार आहेत. ‘एल 2’, ‘एल 3’ या स्तरावर असणार्या रुग्णालयांमध्ये कर्करोगासंबंधित प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे, तसेच या आजाराविषयी संशोधन कार्यात प्रगती करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने याबाबत धोरण निश्चित केले आहे.
महाकेअर फाऊंडेशनची स्थापना
‘एल 2’ व ‘एल 3’ स्तरावरील आरोग्य संस्थांना आवश्यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, संस्थांचे व्यवस्थापन करणे, ‘पीपीपी’ धोरण राबविणे, तसेच इतर अनुषंगिक बाबी पार पाडणे आदी बाबींसाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली महाकेअर फाऊंडेशन ही कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना निमंत्रित सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.