School Bus Safety | शालेय बस, व्हॅनमधील सुरक्षा उपायांची ३१ जानेवारीपर्यंत पूर्तता करा

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे जिल्ह्यातील सर्व शाळा व्यवस्थापनांना आवाहन
School Bus Safety |
School Bus Safety | शालेय बस, व्हॅनमधील सुरक्षा उपायांची ३१ जानेवारीपर्यंत पूर्तता करा
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने शाळा बस व व्हॅनसाठी असणार्‍या सुरक्षा नियमांची पूर्तता ३१ जानेवारी २०२७ पर्यंत करणे आवश्यक आहे, जिल्ह्यातील सर्व शाळा व्यवस्थापनांनी या विहित मुदतीत आवश्यक उपाययोजना पूर्ण कराव्यात, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी यांनी केले आहे.

शालेय बस व शाळा व्हॅनची कमाल वयोमर्यादा १५ वर्षांवरून वाढवून २० वर्षे केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व वाहनांमध्ये व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस, पॅनिक बटण, अग्निसुरक्षा यंत्रणा आणि सीट बेल्ट बसविणे अनिवार्य आहे.

शालेय वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रवासाचे लाईव्ह ट्रॅकिंग उपलब्ध करून देणे तसेच सीसीटीव्ही फुटेजचा ३० दिवसांचा बॅकअप ठेवणे सक्तीचे आहे. याशिवाय पूर्व प्राथमिक तसेच इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी महिला अटेंडंट नियुक्त करणे बंधनकारक आहे. बस चालक व महिला सहवर्ती यांची पोलिस चारित्र्य पडताळणी संबंधित शाळा व्यवस्थापनाने करून घेणे बंधनकारक आहे.

निर्धारित मुदतीत सुरक्षा नियमांची पूर्तता न करणाऱ्या वाहनांवर पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागामार्फत कारवाई करण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा व्यवस्थापनांनी ३१ जानेवारी २०२७ पूर्वी आवश्यक सुरक्षा उपाययोजनांची पूर्तता करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले.

११०० बसमधून २५ हजार विद्यार्थ्यांचा प्रवास

जिल्‍ह्यात विविध शाळा शैक्षणिक संस्‍थांच्‍या एक हजार ४८ स्‍कूल बसेस आहेत. या सर्व बसेसमधून रोज सुमारे २५ हजारावर विद्यार्थी प्रवास करीत असतात. या सर्व विद्यार्थ्यांच्‍या सुरक्षेसाठी नियमावली बनविण्‍यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.