Kolhapur News| धरणातील पाण्याचे नियोजन करा

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड; दुष्काळी स्थितीचा बैठकीत आढावा
Kolhapur News
कोल्हापूर : दुष्काळ देखरेख समितीच्या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड. यावेळी उपस्थित अधिकारी.
Published on
Updated on

कोल्हापूर : यंदा अल् निनोच्या प्रभावामुळे सर्वत्र पर्जन्यमान कमी आहे. जिल्ह्यात सरासरीच्या साधारणत: ५१ टक्के इतकाच पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक धरणातील पाणीसाठा तपासा, त्यानुसार पाण्याचे नियोजन करा, चाऱ्याचेही नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी मंगळवारी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पर्जन्यमान, खरीप हंगामातील पिकांची सद्य:स्थिती, पीक विमा तसेच आगामी रब्बी हंगामाच्या नियोजनाबाबत जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची आढावा बैठक झाली. डॉ. राठोड म्हणाले, जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. यामुळे पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील धरणनिहाय पाणीसाठा तपासा. पशुसंवर्धन विभागाने चारा नियोजनाच्या अनुषंगाने आत्तापासूनच तयारी करावी. तसेच संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पीक स्थितीची पाहणी करावी.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी जिल्ह्यातील कृषी क्षेत्राच्या सद्य:स्थितीचा आढावा सादर केला. ते म्हणाले, २१ सप्टेंबरअखेर जिल्ह्यात ८८२.६ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. सुमारे ८७.३८ टक्के म्हणजेच १.५८ लाख हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. कमी पावसाने हलक्या जमिनीवर काही भागात ओलावा कमी झाल्याने पिकांच्या वाढीवर परिणामाची शक्यता आहे. यापुढे समाधानकारक पाऊस न झाल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

बैठकीला उपसंचालक नामदेव परीट, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, आत्मा प्र. संचालक रक्षा शिंदे, पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. महेश शेजाळ, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता मिलिंद किटवाडकर, भूजलचे वरिष्ठ भूवैज्ञानिक शशिकांत निंबाळकर आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news