

कोल्हापूर : कोल्हापुरात पुन्हा कडाक्याची थंडी परतली आहे. गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीची तीव्रता काहीशी कमी झाली होती. मात्र, गुरुवारपासून तापमानात घसरण सुरू झाल्याने हुडहुडी भरवणार्या थंडीची अनुभूती होत आहे. शुक्रवारी किमान तापमान 14.4 अंशांपर्यंत घसरले होते. यामुळे सायंकाळी व पहाटे थंडीचा कडाका वाढला होता. दिवसभर उन्हाचा चटकादेखील जाणवत होता.
शहरासह जिल्ह्यात सायंकाळनंतर हवेत गारवा निर्माण होत आहे. रात्री थंडीची तीव्रता वाढत असून पहाटे हुडहुडी भरत आहे. यामुळे नागरिक स्वेटर, कानटोपी, जॅकेटस्चा आधार घेत आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी शेकोट्याही पेटू लागल्या आहेत. सापेक्ष आर्द्रतेत झालेली घसरण आणि निरभ्र आकाश यामुळे थंडीची तीव्रता वाढत आहे. कमाल तापमान 29.6 अंशांवर स्थिरावले होते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील सात दिवस थंडीची तीव्रता कायम राहणार असून किमान तापमानात किंचित चढ-उतार पाहायला मिळेल.