कोल्हापूर : जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. शहरात सोमवारी पारा 16 अंशांवर आला होता. मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत थंडीची तीव्रता कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट होत आहे. परिणामी, जिल्ह्यात थंडी वाढत चालली आहे. सोमवारी हवेत दिवसभर काहीसा गारठा जाणवत होता. सायंकाळनंतर त्याची तीव्रता अधिक जाणवत होती. यामुळे सायंकाळनंतर रस्त्यांवरील वर्दळ तुलनेने काहीशी कमी झाल्याचे चित्र शहरात होते. थंडीचा कडाका वाढल्याने सायंकाळनंतर शहरी भागासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र होते. लोक घराबाहेर पडताना, विशेषत: सायंकाळनंतर स्वेटर, कानटोपी परिधान केलेले दिसत होते. स्वेटर, जॅकेट, कानटोपी, हातमोजे अशी उबदार कपडे खरेदीसह थंडीपासून बचाव करणार्या क्रीम, मलम आदींची खरेदी करण्यासाठीही गर्दी वाढल्याचे चित्र दिसत होते.
सोमवारी शहरात कमाल आणि किमान तापमानात सरासरीपेक्षा घट झाली. सरासरीपेक्षा 1.5 अंशाने पारा घसरल्याने किमान तापमान 28.7 अंश इतके नोंदवले गेले. किमान तापमानातही 1.1 अंशाने घट झाली. यामुळे किमान पारा 16.7 अंशांवर स्थिरावला. सायंकाळनंतर तापमानात आणखी घट होत गेली.
जिल्ह्याच्या चंदगड, आजरा, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी आदी तालुक्यांतील डोंगराळ भागात पारा 12 ते 13 अंशांपर्यंत खाली आला होता. दि.29 पर्यंत जिल्ह्यात पारा 16 अंशांपर्यंत राहील, अशी शक्यता असल्याने थंडीचा कडाका आणखी काही दिवस राहण्याचा अंदाज आहे.