

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या २०२१ मधील निवडणुकीतही मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप झाला होता. या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीची सांगड घातली होती. तेव्हापासूनच गोकुळमध्ये पक्षीय राजकारणाची प्रथा रुढ झाल्याचा आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
खा. महाडिक यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक आणि दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या काळात गोकुळच्या निवडणुकीत पक्षीय राजकारण नव्हते. मात्र, मागील निवडणुकीपासून गोकुळमध्ये पक्षीय राजकारण आले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांची सांगड घातल्यानंतर ही पद्धत सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुती म्हणून एकदिलाने लढण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. जागावाटपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अंतिम निर्णय घेणार असून, येत्या दोन दिवसांत जागावाटपाचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रत्येक पक्षाकडे असलेल्या ठरावांच्या संख्येनुसार जागावाटप होईल. प्रत्येक पक्षाला अधिक जागा हव्या आहेत. त्यामुळे चर्चेतून सुमारे ८० टक्के निर्णय झाला असून, उर्वरित २० टक्के निर्णय मुख्यमंत्र्यांकडे सोपविला आहे. मुख्यमंत्री हे महायुतीमधील चारही घटक पक्षांचे प्रमुख असल्याने जागावाटपाबाबत ते जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल, असेही खा. महाडिक यांनी स्पष्ट केले.
पुणे पदवीधर, शिक्षक दोन्ही जागा भाजपच्या
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दोन्ही जागा भाजप लढविणार आहे. विद्यमान आमदार लाड यांचे कुटुंब भाजपमध्ये आल्याने पुणे पदवीधर जागेवर भाजपचा दावा आहे. तसेच मागील निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत झाल्याने पुणे शिक्षक मतदारसंघावरही भाजपचा दावा असल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले.