

चंदगड : कोल्हापूर या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 150 किलोमीटर दूरवर असणाऱ्या चंदगड तालुक्यासाठी तातडीने अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करू आणि चंदगडचा पर्यटन विकास आराखडा मंजूर करू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. चंदगड, आजरा नगर पंचायत व गडहिंग्लज नगर परिषदेवर आमच्या महायुती आणि आघाडीला सत्ता द्या. चंदगडसह आजरा, गडहिंग्लज शहरांचा चेहरा मोहरा बदलून टाकू, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.
चंदगड येथे रविवारी झालेल्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी विशेष आराखडा बनवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. व्यासपीठावर खा. धनंजय महाडिक, आ. अमल महाडिक, चंदगडचे आ. शिवाजी पाटील, राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री भरमू पाटील, माजी आमदार संजय घाटगे, अंबरिश घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मी चंदगडकरांना शब्द दिला होता, पुन्हा एकदा येईन म्हणून. त्यामुळे आता आलो आहे. नगर पंचायत निवडणुकीत एक व्हा आणि विकासाला संधी द्या. चंदगड, आजरा, गडहिंग्लज हा सीमावर्ती भाग म्हणजे महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहे. या भागाचा योग्य दृष्टीने विकास झाला पाहिजे. स्वातंत्र्यानंतर 65 वर्षे पूर्वीच्या सरकारने शहरांच्या विकासाकडे फारसे लक्ष दिले नाही. रोजगार तसेच विविध उद्योगधंद्यानिमित्त ग््राामीण भागातील कोट्यवधी नागरिक शहराकडे गेले. मात्र शहरांचा विकास झाला नाही. शहरात नाला दुर्गंधी, रोगराई, पाण्याची कमतरता, कचऱ्याचे ढीग साचत गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून गावांच्या विकासाबरोबर शहरांचा विकास सुरू केला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या दृष्टिकोनातून शहरांचा विकास होत गेला. याच धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक नगर पंचायत, नगर परिषद, नगरपालिकांचा विकास करायचा आहे. केंद्र सरकारने अमृत योजनेअंतर्गत 50 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. यातून महाराष्ट्रातील शेकडो शहरांचा विकास होत आहे. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी आमदार झाल्यानंतर राज्य सरकारकडून कोट्यवधींच्या निधी खेचून आणला आहे. आतापर्यंत सुमारे 300 कोटींची विकासकामे मंजूर करून घेतली आहेत. त्यांनी चंदगड नगर पंचायतीसाठी 197 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. आगामी काळात सत्ता द्या. या तिन्हीही शहरांचा चेहरामोहरा ते बदलून टाकतील. 90 हजार कोटी रुपयांच्या निधीतून होणारा शक्तिपीठ मार्ग व्हावा म्हणून शिवाजी पाटील यांनी सर्वप्रथम आंदोलन केले. हा महामार्ग जिथून जातो तिथे रोजगार, उद्योगधंदे निर्माण होऊन त्या भागाचा विकास होतो. शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात शिवाजी पाटील यांची दूरदृष्टी आहे. त्यामुळे मी चंदगडकडे शक्तिपीठचा मार्ग चंदगडमधून पुढे गोव्याकडे नेणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.
चंदगड येथे लॉजिस्टिक पार्क, एमआयडीसी उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आमदार शिवाजी पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे येथे जे महाबळेश्वर, माथेरानचा लुक आहे, त्या दृष्टिकोनातून चंदगड तालुक्याचा आणि मतदारसंघाचा पर्यटनदृष्ट्या विकास आराखडा बनवून तो प्रत्यक्षात अंमलबजावणी करू. चंदगड पर्यटन दृष्टीचा हब म्हणून पुढे नावारूपाला येईल यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. चंदगड, आजरा व गडहिंग्लज शहरासाठी पुरेसे पिण्याचे पाणी, घनकचरा, सांडपाणी कचरा प्रकल्प राबवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
प्रारंभी आ. शिवाजी पाटील यांनी चंदगडचा पर्यटन विकास, येथील धनगरवाडे, वाघोत्रे येथे पवन ऊर्जा प्रकल्प राबवावेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली. बेळगाव ते वेंगुर्ला हा रस्ता दहा मीटर रुंदीकरण, चंदगड येथे उपजिल्हा म्हणून मान्यता मिळावी, याबाबत अपेक्षा व्यक्त केली. याला अनुसरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी चंदगड येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली. तसेच आ. पाटील यांनी इंडॉल येथील 25 एकर जमिनीमध्ये आयुष्यमान हॉस्पिटल सुरू करण्यासाठी विनंती केली.
खा. महाडिक म्हणाले, आ. शिवाजी पाटील यांच्यामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघांमध्ये विकासकामांना गती येत आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीचे माजी अध्यक्ष महेश जाधव होते.