

कोल्हापूर : जुना बुधवार पेठ येथे उभारण्यात आलेल्या राजर्षी छत्रपती शाहू पोलिस संकुलाचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.
सुमारे 33 कोटी रुपये खर्चून महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत बांधण्यात आलेल्या या संकुलात एकूण 163 सदनिका आहेत. यामधील निवडक अधिकारी व कर्मचार्यांना सदनिकेच्या चाव्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या. प्रास्ताविकात जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी कोल्हापूर पोलिस दलाच्या कामगिरीचा आढावा घेतला. ते म्हणाले, ‘मिशन झिरो ड्रग्ज’ अंतर्गत आतापर्यंत 27 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही मोहीम अधिक जोमाने सुरू राहील.
याप्रसंगी पोलिस महासंचालक अर्चना त्यागी, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, अतिरिक्त अधीक्षक अभियंता राहुल मोरे, खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील-यड्रावकर, शिवाजी पाटील, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार सुजित मिणचेकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमात कुरुंदवाड पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे ऑनलाईन उद्घाटनही करण्यात आले. संकुल उभारणीचे काम करणार्या आर्किटेक्ट गिरीजा कुलकर्णी, ठेकेदार मोतिलाल पारिख व अधीक्षक अभियंता राहुल मोरे यांचा सत्कार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित कंदले यांनी केले. यावेळी पोलिस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.