CM Devendra Fadnavis |कोल्हापूर, सांगली साडेतीन वर्षांत महापूरमुक्त करू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; प्रस्ताव द्या, कोल्हापूरच्या हद्दवाढीवर 15 मिनिटांत स्वाक्षरी : ‘मिसळ कट्टा’ कार्यक्रम
CM Devendra Fadnavis
कोल्हापूर : 1) महायुतीच्या प्रचारार्थ आयोजित ‘मिसळ कट्टा’ कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 2) महायुतीच्या प्रचारार्थ आयोजित ‘मिसळ कट्टा’ कार्यक्रमास उपस्थित मान्यवर. (छाया : पप्पू अत्तार)
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली येत्या तीन-साडेतीन वर्षांत महापूरमुक्त करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत जनता आणि नेते तयार असतील, त्यांनी तसा प्रस्ताव दिला तर त्यावर 15 मिनिटांतच सही करू, असे सांगत उमेदवारांचे चिन्ह पाहून मतदान करा, महायुतीला विजयी करा, पायाभूत सुविधांचे जाळे उभारून कोल्हापूर शहराला नवा चेहरा देऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर महापालिका निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित ‘मिसळ कट्टा’ कार्यक्रमात त्यांची प्रकट मुलाखत झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कोल्हापूर आणि सांगलीला 2019 मध्ये आलेला महापूर आपण पाहिला, त्याचा अभ्यास केला, त्यावेळी लक्षात आले की, दरवर्षी कोल्हापूर आणि सांगलीला पूर येतच राहणार. एकीकडे दरवर्षी पूर आणि पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागांत दरवर्षी दुष्काळ असतो. यामुळे महापुराचे पाणी दुष्काळी भागात वळवण्याची योजना तयार केली, ती जागतिक बँकेला सादर केली, त्यांनीही त्याला मंजुरी दिली.

महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांचा हक्क नसलेले, कोल्हापूर-सांगली भागातून दरवर्षी 120 टीएमसी पाणी केवळ वाहून जाते, यापैकी 30 ते 35 टीएमसी पाणी कॅनॉल आणि टनेलच्या माध्यमातून उजनीपर्यंत नेले जाईल आणि तेथून पुढे ते मराठवाड्यात नेण्यात येईल, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या प्रकल्पातील 500 कोटींचे काम सुरू झाले आहे. उर्वरित 3 हजार कोटींचे काम निविदास्तरावर आहे. ही सर्व कामे येत्या तीन ते साडेतीन वर्षांत पूर्ण होतील आणि कोल्हापूर, सांगली महापूरमुक्त होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूरची हद्दवाढ केलीच पाहिजे, असे सांगत फडणवीस म्हणाले, हद्दवाढ केल्याशिवाय कोल्हापूरचा विकास आणि विस्तार होणार नाही. हद्दवाढ झालेल्या भागात कर वाढवला जाणार नाही. हद्दवाढ झाली तर जमिनीचे भाव वाढतात, नवी अर्थव्यवस्था उभी राहते, उत्पन्नाचे नवे मार्ग तयार होतात. हद्दवाढीचा निर्णय हा लोकांचा आणि नेत्यांचा विषय आहे, त्याला माझीही तयारी आहे, प्रस्ताव आला तर मी 15 मिनिटांत सही करतो.

पाण्याची गुणवत्ता कमी झाली की इको-सिस्टीमला बाधा येते. यामुळे पंचगंगा प्रदूषण रोखणे गरजेचे आहे, ते येत्या तीन वर्षांत रोखले जाईल, असे सांगत फडणवीस म्हणाले, मोठ्या शहरांतील सांडपाण्यावर प्रक्रिया, नदीकाठावरील गावांतील सांडपाण्यावर प्रक्रिया आणि लहान-मोठ्या उद्योगांतील सांडपाण्यावर प्रक्रिया, अशा तीन टप्प्यांत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे काम हाती घेतले आहे, त्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या मदतीने आराखडा तयार केला असून, पंचगंगाही लवकरच प्रदूषणमुक्त होईल, असेही त्यांनी सांगितले. मुंबई-बंगळूर नवा ‘इंडस्ट्रियल कॉरिडोर’ उभारला जात आहे, त्यात इंडस्ट्रियल टाऊनशिप, इंडस्ट्रियल इस्टेट उभारल्या जाणार आहेत, कोल्हापुरातही त्या उभारल्या जातील, असे सांगत राज्यात गुंतवणूक वाढत आहे. त्यापैकी 7-8 प्रकल्प कोल्हापुरात येत आहेत, त्याबाबतचे करार आपण केल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

आयआयटीच्या धर्तीवरच राज्यात आता ‘इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्हिटी’ (आयसीटी) उभारण्यात येणार असल्याचे सांगत फडणवीस म्हणाले, कोल्हापुरात लवकरच ‘आयटी हब’ही सुरू होईल. मोठ्या कंपन्या येतील, यामुळे कोल्हापूर विमानतळाचाही विकास वेगाने सुरू आहे. धावपट्टीचे विस्तारीकरण होत आहे. येत्या काही दिवसांत कोल्हापूर विमानतळाची कनेक्टिव्हिटी चौपट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर तसेच महायुतीच्या घटकपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पाप केले तर नगरसेवक, महापाप केल्यास महापौर

नगरसेवकांच्या जबाबदार्‍या काय आणि त्यांचे महापालिकेचे कामकाज कसे असावे, यावर बोलताना फडणवीस म्हणाले, आपण दोनवेळा नगरसेवक आणि दोनवेळा महापौर होतो. मागच्या जन्मी पाप केलेला नगरसेवक आणि महापाप केलेला महापौर होतो. कारण, नागरिकांच्या पहिल्या रोषास त्यांना सामोरे जावे लागते. कामही करून घेतात व चार शिव्याही देतात. गटार तुंबल्यापासून ते लाईट गेल्यापर्यंत सर्व कामे नगरसेवकाला सांगितली जातात. लोकांनाही कोणते काम कोणाला सांगायचे हेच कळत नाही, नगरसेवकांचे काम खासदाराला, खासदाराचे काम आमदाराला सांगतात. काहीजण प्रभागालाच मालक समजतात, ही मानसिकता बदलली पाहिजे. सेवक म्हणूनच काम केले पाहिजे.

निवडणुकांत रस्ते, दिवाबत्ती, पाणीपुरवठा, स्वच्छता हेच प्रश्न

निवडणुकांत रस्ते, दिवाबत्ती, स्वच्छता, अपुरा पाणीपुरवठा यापेक्षा वेगळ प्रश्न नाहीत. म्हणजेच राज्यकर्त्यांनी जनतेस झुलवत ठेवले का? यावर ते म्हणाले, देश स्वतंत्र झाल्यानंतर गावचा विकास हाच देशाचा विकास हे सूत्र होते. त्यामुळे शहरांकडे दुर्लक्ष झाले. त्यातून हे प्रश्न निर्माण होत गेले. दुसरीकडे, शहरीकरण होत आहे, त्यातून घनकचरा, सांडपाणी, झोपडपट्ट्यांच्या समस्या निर्माण होत आहेत; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरांबाबत संकल्पना बदलून स्मार्ट सिटी, अमृत योजना, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, शहरी मिशन अशा योजनांतून हजारो कोटी रुपये शहरासांठी दिले. महाराष्ट्रास 50 हजार कोटी दिले आहेत. यामुळे भविष्यात नेहमीच्या समस्यांचे चित्र नसेल, असेही ते म्हणाले.

कोल्हापूरची वेगळी ओळख, स्वतंत्र क्षमता

मुंबई, पुणे, नागपूर वेगाने बदलताना दिसत आहे. त्यावर कोल्हापूरची वेगळी ओळख आहे, त्याचीही स्वतंत्र क्षमता आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे त्या त्या काळातील जगभरातील नवीन गोष्टी या जिल्ह्यात आल्या आहेत, असे सांगत फडणवीस म्हणाले, या शहराचे प्रश्न सोडवावे लागतील. फ्लाय ओव्हर तयार केले जाणार आहेत. रिंग रोडसह अंतर्गत रोड व्यवस्थित केल्यास वाहतूक सुरळीत होईल.

लाडक्या बहिणींना लखपती दीदी करणार

लाडक्या बहिणींना दिल्या जाणार्‍या पंधराशे रुपयांतून त्यांना काय मिळाले, अशी विचारणा काही महाभाग करतात, असे सांगत फडणवीस म्हणाले, या योजनेने महिलांचा घरातील सन्मान वाढला आहे. आता केवळ 1,500 रुपये देऊन आम्ही थांबणार नाही. पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेल्या लखपती दीदी योजनेचा लाभ त्यांना देऊ, गेल्या तीन वर्षांत राज्यात 50 लाखांहून अधिक लखपती दीदी झाल्या. आता तीन महिन्यांत त्या 1 कोटीपर्यंत नेऊ, असेही त्यांनी सांगितले.

अत्याधुनिक दर्जाच्या क्रीडा सुविधा देऊ

कोल्हापूर आणि खेळाचे खूप जुने नाते आहे. याच जिल्ह्याने देशाला अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू दिलेत. जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि सुविधा येथील खेळाडूंना मिळाल्या पाहिजेत, त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राहुल गांधींमुळे भाजप सत्तेत

राजकारणात राहुल गांधी हेच विरोधक आहेत. ते विरोधक आहेत म्हणून भाजप सत्तेत आहे, असा उपरोधिक टोला फडणवीस यांनी लगावला. राजकारणात नसतो तर वकिली केली असती, असे सांगून एकनाथ शिंदे सामाजिक कार्यकर्ता आणि अजित पवार शेतकरी किंवा पोलिस निरीक्षक झाले असते, असे म्हणताच सभागृहात हास्याचे कारंजे उडाले.

टोलमाफीचा ऐतिहासिक निर्णय

या शहरातील रस्ते क्राँकीटचे झाले. मात्र, त्याकरिता 700 कोटी रुपये टोलमधून वसूल केले जाणार होते. कोणत्याही शहरात अंतर्गत रस्त्यांना टोल नाही, कोल्हापूरला का? असे नागरिकांनी आपल्याला सांगितले आणि टोलमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला, असे फडणवीस यांनी सांगितले.

हद्दवाढ नको म्हणणार्‍यांची बैठक घेऊ

हद्दवाढीला विरोधही होत आहे. हद्दवाढ नको म्हणणार्‍यांची बैठक घेऊ, त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ, त्यांना समजावून सांगू, त्यांच्या हद्दवाढीबाबत असलेल्या सर्व शंका दूर करू, त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यास तयार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय गुरू

राजकारणात आणि कुटुंबात चूक झाल्यास केवळ आईच मला परखडपणे सांगू शकते. त्यामुळे आईच गुरू आहे, तर राजकीय गुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. अरजित सिंग आवडता गायक, तर श्रेया घोषाल आवडती गायिका आहे.

टोकाच्या विरोधाने आपण घाबरलो अन् प्राधिकरणाची घोषणा केली

आपण पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो, त्यावेळी हद्दवाढीबाबत जिल्ह्यातील एका दिवंगत नेत्याने इतका टोकाचा विरोध केला की, आपण घाबरून गेलो अन् विकास प्राधिकरणाची घोषणा केली. मात्र, प्राधिकरणाने आता भागत नाही. त्यामुळे हद्दवाढ केल्याखेरीज गत्यंतर नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news