CM Devendra Fadnavis | इचलकरंजीचा पाणी प्रश्न मार्गी लावणार

मुख्यमंत्र्यांची ग्वाही; योजनेला हवा तेवढा निधी देणार
इचलकरंजी : महायुतीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयी संकल्प यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
इचलकरंजी : महायुतीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयी संकल्प यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (छाया : अनंतसिंग)
Published on
Updated on

इचलकरंजी : इचलकरंजीसाठी वाटेल तितका निधी देऊ आणि इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कोणत्याही परिस्थितीत सोडवू. इचलकरंजी महापालिकेच्या ‘जीएसटी’ परताव्याचा प्रश्न आपण सोडवला असून, आणखी निधी देऊ. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून, 15 तारखेला तुम्ही आमची काळजी घ्या, पुढची पाच वर्षे आम्ही तुमची काळजी घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मताच्या माध्यमातून आशीर्वाद द्या, इचलकरंजीत महायुतीचा सर्वात मोठा विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विजयी संकल्प रॅली शनिवारी पार पडली. यानंतर महात्मा गांधी पुतळा परिसरात त्यांनी संवाद साधला. तत्पूर्वी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळ्यापासून विजयी संकल्प रॅलीला उत्साहात प्रारंभ झाला. खुल्या जीपमधून मुख्यमंत्री फडणवीस व मान्यवर सहभागी झाले होते, तर मोठ्या वाहनामध्ये महायुतीचे सर्व उमेदवार होते. ढोल-ताशांचा कडकडाट, झांज पथकाचा निनाद, फटाक्यांची आतषबाजी, जोरदार घोषणा आणि साथीला उत्स्फूर्त नागरिक, अशा उत्साही वातावरणात मुख्य मार्गावरून रॅली निघाली. श्री शिवतीर्थ आणि श्री शंभूतीर्थ येथे मुख्यमंत्र्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. रॅलीमध्ये उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खा. धैर्यशील माने, आ. राहुल आवाडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी आ. प्रकाश आवाडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर आदी प्रमुख उपस्थित होते.

मुख्य मार्गावरून निघालेल्या रॅलीची महात्मा गांधी पुतळा परिसरात सांगता झाली. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, महायुती सरकारने आजवर केलेली विकासकामे आणि भविष्यात करणारी विकासकामे यावरच मत मागायला आलो आहोत. इचलकरंजीसाठी 18 एमएलडीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, 116 कोटींचा 54 एमएलडीचा जलशुद्धीकरण प्रकल्प राज्यात मॉडेल ठरेल, असा होणार आहे. नगरोत्थान योजनेंतर्गत 107 कोटी रस्त्यांसाठी, तर पाणीपुरवठ्यासाठी अन्य कोट्यवधी रुपयांची कामे केली आहेत. आमदार आणि खासदार यांच्या पाठपुराव्यातून विकासकामे होत असून, 489 कोटींचा झेडएलडी प्रकल्प महाराष्ट्रात पहिल्यांदाच इचलकरंजीसाठी दिला आहे. यासाठी 100 टक्के अनुदानही राज्य शासनाने दिले आहे. 32 कोटींचे जलकुंभ, नाट्यगृह नूतनीकरण, टागोर वाचनालय नूतनीकरण, मोठ्या तळ्याचे पुनर्जीवन आदींसह विविध कामे शासन आणि महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. रोड शोच्या माध्यमातून जो आशीर्वाद दिला आहे त्याच्या दुप्पट निधी भविष्यात आम्ही शहराला देऊ, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

शहरे 65 टक्के ‘जीडीपी’ तयार करतात. वस्तू आणि सेवांची निर्मिती शहरात होते. ग्रामीण भागातून शहरात आलेल्या नागरिकांना सर्व सुविधा द्यायच्या आहेत. त्यासाठी पंतप्रधान मोदींनी मोठ्या प्रमाणात शहरांसाठी योजनाही दिल्या आहेत. त्यातून विकास होताना दिसत आहे. इचलकरंजीच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह आम्ही सर्वजण पाठीशी आहोत. येत्या 15 तारखेला मतदानासाठी बाहेर पडून महायुतीचे सर्व उमेदवार निवडून द्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले. महापालिकेची पहिली निवडणूक होत असली, तरी आजवरच्या इतिहासातील नवा उच्चांक होऊन महायुतीचा सर्वात मोठा विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रकाश दत्तवाडे, रवींद्र माने, बाबासो चौगुले, शेखर शहा, मोसमी आवाडे, बाळासाहेब माने यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मोदी सरकारकडून मिळणार्‍या निधीमुळे शहरांचा विकास

70 वर्षांत केंद्र सरकारकडून शहरांच्या विकासासाठी निधी येत नव्हता, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र, मोदी सरकारकडून विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येत असल्याने शहरांचा विकास होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी स्मार्ट सिटी, अमृत सिटी, स्वच्छ भारत, शहरी प्रधानमंत्री आवास योजना, असे उपक्रम राबवत 30 ते 35 हजार कोटींहून अधिकचा निधी महाराष्ट्रासाठी दिला आहे. हा निधी चुकीच्या हातात पडू नये; अन्यथा हा पैसा पुन्हा भ्रष्टाचारामध्ये फस्त होऊन जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news