

कोल्हापूर : कोल्हापूर हे आल्हाददायक वातावरणामुळे जगप्रसिद्ध झालेले शहर. कोल्हापुरात 1848 ते 1851 या कालावधीत पश्चिमेकडून वाहणारे गार वारे, कमाल आणि किमान तापमानातील कमी अंतर असे प्रत्येक सजीवासाठी पोषक वातावरण होते, असा उल्लेख कोल्हापूरचे पहिले पॉलिटिकल सुपरिटेंडंट मेजर डी. सी. ग्राहम यांनी त्यांच्या अहवालात आढळतो. अगदी दीड-दोन दशकांपूर्वीही येथील वातावरण आल्हाददायकच होते. पण, गेल्या काही वर्षांत अत्यंत कमी जागेत होणारा दिशाहीन विकास आणि हवामान बदलाची झळ कोल्हापूरला बसली आहे. परिणामी कमाल आणि किमान तापमानातील अंतर वाढत चालले आहे. यामुळेच उन्हाळ्यात पावसाळा, पावसाळ्यात हिवाळा अन् हिवाळ्यात उन्हाळा असे आरोग्यास आणि पिकास बाधक वातावरण होत आहे.
झपाट्याने बदलत चाललेल्या वातावरणास हवामान बदलासह जंगलांची कत्तल, वाढती लोकसंख्या, काँक्रिटीकरण, वाहनांची बेसुमार वाढ आणि सर्वात महत्त्वाचे मर्यादित जागेतच होणारा दिशाहीन विकास कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे वेळीच सावध होऊन ठोस पावले न उचलल्यास हवामान बदलाचा हा राक्षस आपल्याला गिळंकृत करून टाकेल.
कमाल-किमान तापमानातील फरकाला दैनंदिन तापमान श्रेणी (डीटीआर) म्हणतात. दोन तापमानात फरक वाढल्यास याचा ऋतुमानावर, पिकांवर, मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अॅडव्हान्स अर्थ अँड स्पेस सायन्सच्या एका संशोधन अहवालानुसार हवामान बदलामुळे दैनंदिन कमाल आणि किमान तापमानातील अंतर कमी-जास्त होत चालले आहे. हवामान बदलाच्या फटक्यामुळे ढगांच्या दिशेत बदल होत चालल्यामुळे थंडीत उन्हाळा जाणवत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या अनेकदा सायंकाळी निरभ— आकाश नसते. परिणामी सरफेस हीट रेडिएशन्स अर्थात जमिनीवरील उष्णता ट्रोपोस्फेअरमध्ये जात नाही. आकाश निरभ— असल्यास पृथ्वीच्या वायुमंडळातील सर्वात खालचा थर असणार्या ट्रोपोस्फेअरमध्ये ही उष्णता जात असते. यामुळे तापमान नियंत्रणात राहते.
ढगांची निर्मिती आणि त्यांची दिशा ही तापमानावर आणि वातावरणात बदल घडवून आणत असते. ढग हे पृथ्वीच्या ब्लँकेटसारखे काम करतात. सूर्याकडून येणारी किरणांची तीव—ता ढगांच्या थरावर आदळून कमी होते. यामुळे पृष्ठभागावरील तापमान नियंत्रणात राहते; मात्र क्लायमेट चेंजमुळे कोल्हापुरातील ढगांच्या दिशेत बदल होत आहे. यामुळेच तापमानात मोठा फरक जाणवत आहे
कोल्हापूरचा दिशाहीन विकास होत आहे. कमी जागेत काँक्रिटचे जंगल आणि वाहनांची बेसुमार वाढ झाली आहे. याचाही फटका कोल्हापूरच्या वातावरणावर होत आहे. वाहनांचा लोंढा आणि झाडांची कत्तल यामुळे अर्बन हीट आयलंड इफेक्ट दिसत असल्याने शहर तापत आहे.