

कोल्हापूर : आंतरजिल्हा बदलीसाठी चंदगड पोलिस ठाण्यातील पोलिसाकडून मुख्यालयातील आस्थापना शाखेतील प्रमुख लिपिकाने 30 हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला. वाहतूक शाखेतील महिला कॉन्स्टेबलच्या मध्यस्थीने हा प्रकार घडला. याप्रकरणी लिपिक संतोष मारुती पानकर (वय 40, रा. कसबा बावडा) व महिला कॉन्स्टेबल धनश्री उदय जगताप (25, रा. कसबा बावडा) यांच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित संतोष पानकरला पहाटे अटक करण्यात आली.
पोलिस मुख्यालयातील आस्थापना शाखेत सुरू असलेला खाबूगिरीचा प्रकार वरिष्ठ अधिकार्यांच्या सतर्कतेमुळे चव्हाट्यावर आल्याने पोलिस वर्तुळात खळबळ माजली आहे. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी याची गंभीर दखल घेत, अपर पोलिस अधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले आहेत. अधिकाराचा गैरवापर करणार्या अधिकारी, कर्मचार्यांवर कठोर कारवाईचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, तक्रारदार रितेश मनोहर ढहाळे (31, रा. चंदगड, मूळ गाव वासाळी, जि. नाशिक) हे चंदगड पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. वडिलांच्या आजारपणाच्या काळात देखभालीसाठी त्यांनी नाशिक येथे आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे रीतसर अर्ज दाखल केला होता.
आस्थापना शाखेतील प्रमुख लिपिक संतोष पानकर याच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी अर्ज गेला. त्याने महिला कॉन्स्टेबल धनश्री जगताप हिच्याशी संपर्क साधला. बदलीचे काम व्हायचे असेल, तर ढहाळे यांना 30 हजार रुपये द्यावे लागतील, असा निरोप दिला. जगताप हिने ढहाळे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. पानकरला 30 हजार रुपये द्यावेच लागतील; अन्यथा बदलीचे काम होणार नाही, असे सुनावले. ढहाळे यांनी जगतापला 30 हजारांची रक्कम ऑनलाईन पाठविली.
हा प्रकार पोलिस अधीक्षक गुप्ता यांना समजताच त्यांनी शाहूपुरीचे निरीक्षक संतोष डोके यांना तातडीने पाचारण केले. याशिवाय लिपिक पानकरसह धनश्री जगताप हिलाही चौकशीसाठी बोलावले. प्राथमिक चौकशीत तक्रारीत तथ्य आढळल्याने अधीक्षकांनी संशयितांना शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देऊन तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पानकरला अटक करण्यात आली असून, महिला कॉन्स्टेबलला ताब्यात घेण्यात आल्याचे डोके यांनी सांगितले.