

कोल्हापूर : आंतरजिल्हा बदलीसाठी चंदगड पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबलकडून ऑनलाईन 30 हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी पोलिस मुख्यालयातील आस्थापना शाखेचा लिपिक संतोष मारुती पानकर व शहर वाहतूक शाखेतील महिला कॉन्स्टेबल धनश्री उदय जगताप यांना रविवारी सेवेतून निलंबित करण्यात आले. संशयितांनी आणखी दोन कॉन्स्टेबलकडून बदलीसाठी प्रत्येकी 30 हजार रुपये उकळल्याचे चौकशीत उघड झाले आहे.
पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी ही कारवाई करत खाकी वर्दीतल्या खंडणीखोरांना झटका दिला. अप्पर पोलिस अधीक्षकांमार्फत संशयितांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेशही त्यांनी दिले आहेत. संशयितांनी कोल्हापूर पोलिस दलातील आणखी कोणाची आर्थिक पिळवणूक केली असल्यास संबंधितांनी तक्रारी दाखल कराव्यात, असेही त्यांनी आवाहन केले आहे.
संशयित पानकर व कॉन्स्टेबल धनश्री जगताप यांनी चंदगड पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल अश्विन संतोष गुंड (26) व मेहुल वसंत आरज (26) यांच्याकडूनही बदलीसाठी प्रत्येकी 30 हजाराची खंडणी उकळल्याचे निष्पन्न झाले आहे. संशयितांच्या कृत्याची शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे, असे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले.
आंतरजिल्हा बदलीसाठीसाठी चंदगड पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल रितेश मनोहर ढहाळे यांच्याकडून आस्थापना शाखेतील लिपिक पानकर याने महिला कॉन्स्टेबल जगताप हिच्या मध्यस्थीने 30 हजार रुपयांची खंडणी उकळली. हा प्रकार पोलिस अधीक्षक गुप्ता यांच्या निदर्शनास येताच त्यांनी दखल घेत संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते.
शाहूपुरी पोलिसांनी पानकरला अटक केली. मात्र कॉन्स्टेबल जगताप आजारी असल्याचे कारण देत रुग्णालयात दाखल झाली. डिस्चार्ज मिळताच तिला अटक करण्यात येईल, असेही डोके यांनी सांगितले. बदलीसाठी खंडणी उकळल्याप्रकरणी वरिष्ठस्तरावरून झालेल्या कारवाईमुळे पोलिस वतुर्ळात खळबळ उडाली आहे.